मजुरांच्या वाहनाला इगतपुरी तालुक्यात अपघात ; १ ठार, ४ जण जखमी

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे ते नांदगाव बुद्रुक दरम्यान एसएमबीटी हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज झाडे व मजूर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला. या घटनेत ट्रकचा टायर निखळल्याने वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन बाजूच्या शेतात पलटी झाला. या अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला आहे. ३ जण गंभीर जखमी झाले असल्याचे समजते. याशिवाय सहा सात जण किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर गंभीर व किरकोळ जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजच्या मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी एसएमबीटी हॉस्पिटल आणि वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केले. निवृत्ती गुंड यांनी तत्काळ मदत करत सर्व जखमींना योग्य वेळी दाखल केल्याने उपचार लवकर सुरु झाले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या प्रकरणी प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे. लेकबील फाटा ते साकुर फाटा हा रस्ता खड्डेमय झाला असल्याने नागरिकांना जीव मुठीत ठेवून प्रवास करावा लागतो. स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे या भागात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. भारत त्र्यंबक बेंडकुळी वय ३५, दीपक गणपत बेंडकुळी वय ४०, पिंटू बाळू बेंडकोळी वय ४५, समाधान हनुमंतराव वाघ वय ३६ रा. गडगड सांगवी अशी जखमीची नावे आहेत. व्हिडिओ बातमी पहा https://youtube.com/shorts/i6nn-NqOU90?si=xACAQLWTbNNfOefu

error: Content is protected !!