

इगतपुरीनामा न्यूज – सध्याचा काळ हायटेक झाला असून क्यू आर कोडमुळे आजच्या काळात आर्थिक व्यवहार करणे हे सोपे झाले आहे. ह्या बदलत्या काळानुसार इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीचा कारभार सुद्धा हायटेक झाला आहे. नवनवीन करतांना प्रयोग राबवतांना ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शक झाला आहे. यासाठी वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीने नव्या काळानुसार लोकांसाठी आधुनिक पद्धत अवलंबली आहे. ग्रामपंचायतीने विविध प्रकारच्या करवसुलीसाठी संपूर्ण ऑनलाईन सुविधा सुरु केली आहे. घरपट्टी आणि पाणीपट्टीच्या प्रत्येक बिलावर ती रक्कम भरण्यासाठी क्यूआर कोड छापण्यात आले आहेत. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आत आणि बाहेरही हे क्यू आर कोड लावण्यात आले आहेत. ग्रामस्थांना फोन पे, गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे, भारत पे, भीम युपीआय आदी विविध प्रकारे आपल्या कराचा भरणा करता येणार आहे. ऑनलाईन सुविधा देणारी वाडीवऱ्हे ही इगतपुरी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. ग्रामपंचायतीच्या या प्रयोगाचे वाडीवऱ्हे येथील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. ग्रामस्थांना आता वाडीवऱ्हे ग्रामपंचायतीची घरपट्टी आणि पाणीपट्टी ऑनलाईन भरता येणार आहे. सरपंच रोहिदास कातोरे, उपसरपंच प्रवीण मालुंजकर, ग्रामविकास अधिकारी किशोर दळवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी यांच्या कुशल नियोजनातून वाडीवऱ्हे ग्रामपंचायत हायटेक होण्याकडे वाटचाल करीत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करत गावातील प्रत्येक कुटुंबाला आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरता येणार आहे. कर भरण्यासाठी कार्यालयात न जाता थेट ऑनलाईन पद्धतीने क्यूआर स्कॅन करून आर्थिक व्यवहार करता येणार आहे. इगतपुरीच्या गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, विस्ताराधिकारी संजय पवार यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.