विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात – कृषिमंत्री दादाजी भुसे

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

विमा कंपन्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढाव्यात, असे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी विमा कंपन्यांकडून स्थानिक नैसर्गिक आपत्ती व पीक काढणी पश्चात प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत मंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीस खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, आमदार संजय रायमुलकर, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले, संचालक, कृषि आयुक्त विकास पाटील, मुख्य सांख्यिकी कृषि आयुक्त विनयकुमार आवटे, बुलढाणा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. नाईक व संबंधित विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. संबंधित कंपन्यांना पंचनामे करण्याची गती वाढविण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात यावी. पंचनामे करणाऱ्यांचे मनुष्यबळ वाढविण्यात यावे, असे निर्देश कृषि मंत्री श्री. भुसे यांनी दिले. पीक काढण्याच्या अवस्थेत असल्यामुळे पंचनामे करण्याच्या वेळी पीक उपलब्ध नाही या कारणामुळे विमा दावे अपात्र ठरवू शकत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०२० मधील बुलढाणा जिल्ह्याची प्रलंबित नुकसान भरपाई रुपये ६४ कोटी ५९ लाख ही रक्कम पात्र शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावी, असे निर्देशही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला दिले. त्यावर येत्या ८ दिवसात ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येईल, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!