
इगतपुरीनामा न्यूज – ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र म्हणजे वारकऱ्यांचा आत्माच.. हा आत्मा पांडुरंग परमात्म्याच्या इच्छेनेच चालतो. वृक्षाचिये पाने हाले त्याचे सत्ते, कोण बोलवितो हरिवीण ह्या अभंगावर अनेकांची श्रद्धा आहे. प्रत्येक माणसामध्येही हाच पंढरीचा पांडुरंग वास्तव्य करतो हा भक्तीभाव मनात ठेवून काम करणारा बोराडे परिवार आहे. पांडुरंगी मन रमवून ह्या पांडुरंगाच्या भक्तीरंगात बोराडे परिवार आपला उद्योग व्यवसाय सांभाळून रंगून गेलेले असतात. ह्यातच संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा षटतिला एकादशीला संपन्न झाली. एआय आणि मोबाईलच्या अत्याधुनिक जमान्यात माणसं एकमेकांच्या संपर्काला मुकत चालली आहेत. ह्या सर्व माणसांचा मकर संक्रांत व षटतिला एकादशीच्या मंगल पर्वावर “अवघा रंग पांडुरंग” करण्यासाठी बोराडे परिवाराने अनोखी संकल्पना प्रत्यक्षात आणली. नाशिकरोड सामनगाव रस्त्यावरील चेहडी बुद्रुक येथील साई सारीज कलेक्शन ह्या होलसेल आणि रिटेल दुकानाची धुरा सौ. रुपाली सोमनाथ बोराडे ह्या चालवतात. त्यांच्या कुशल व्यवस्थापनातून प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला आगळ्यावेगळ्या पद्धतीने हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला. घरोघरी धार्मिक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम राबवण्यात आला. वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार व्हावा या उद्देशाने वारकरी सांप्रदायिक पद्धतीने महिलांचा हळदी कुंकवाचा वेगळ्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम आकर्षण ठरला. विठू माऊलींच्या आकर्षक रांगोळीची दिमाखदार सजावट उपस्थितांच्या कौतुकाला पात्र ठरली. सहभागी महिलांना विठू माऊलींची मूर्ती वान (भेटवस्तू ) देण्यात आली. यावेळी महिलांनी पारमार्थिक आणि संस्कृती जपणारे उखाणे घेतले. पांडुरंग परमात्म्याला स्मरून भोजनाचा कार्यक्रम महाप्रसाद कार्यक्रमाच्या स्वरूपात रंगतदार झाला. महिलांमध्ये नवदुर्गा लपलेल्या आहेत. परमार्थ आणि सुयोग्य संपर्काच्या माध्यमातून त्यांच्यातील शक्ती विकसित करता येते. परमेश्वराच्या कृपेने हळदी कुंकू कार्यक्रमाचे निमित्त मिळाले. याद्वारे संस्कृती आणि संस्कार टिकवण्यासाठी साई सारीज कलेक्शने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले अशी माहिती सौ. रुपाली सोमनाथ बोराडे यांनी दिली. सौ. निर्मला भीमराव बोराडे, सौ. सुनिता शांताराम बोराडे, सौ. शितल श्याम बोराडे, सौ. सुरेखा नारायण बोराडे, श्री. शांताराम भीमराव बोराडे, श्री. सोमनाथ भीमराव बोराडे आदींनी ह्या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
