मथुरा जाधव यांना आदर्श महिला कृषी उद्योजिका पुरस्कार : कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मथुरा जाधव यांना आदर्श कृषी महिला उद्योजिका पुरस्कार मिळाला आहे. आत्मा आणि कोल्हापूर येथील गार्सिनिया फेडरेशनच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रातील फक्त ५ महिलांना हा पुरस्कार मिळाला असून नाशिक जिल्ह्यातील मथुरा जाधव या एकमेव महिला उद्योजिका आहेत. त्यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे. कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते मथुरा जाधव यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. शेतकरी संवाद या कार्यक्रमानिमित्त राज्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या निवडक महिलांसाठी आदर्श कृषी उद्योजिका पुरस्कार देण्यात येतो. इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद सदस्य नयना गावित, निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान आडोळे, सभापती सोमनाथ जोशी, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, कचरू पाटील डुकरे, माजी सरपंच मनोहर घोडे आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी सौ. जाधव यांचे अभिनंदन केले आहे.

मथुरा जाधव ह्या बचत गटाच्या माध्यमातून इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतमाल विकत घेतात. राज्यातील विविध कृषी प्रदर्शनात हा शेतमाल विक्री करतात. विशेष म्हणजे बाजारभावापेक्षा अधिक किमतीत शेतकऱ्यांना त्या फायदा करून देतात. आरोग्यदायी तांदूळ, कडधान्य थेट ग्राहकांना पोहचविण्याचे काम करत असतात. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन गार्सिनिया फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक संदीप शहापुरकर व संचालिका भारती चव्हाण यांनी केले होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!