
प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
नाशिक आग्रा महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, त्यात पाण्याचे साचलेले डबके, हाडे खिळखिळी करणारी उखडलेली खडी या सर्वांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. महामार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी संघटनेचे नेते तथा घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांनी मुंबई नाशिक एक्सप्रेसवे घोटी टोल प्रशासनाकडे निवेदनाद्वारे दिला होता. याची दखल घेत संबंधीत यंत्रणेने महामार्गाची दुरुस्ती सुरू केली आहे. तुकाराम वारघडे यांनी इशारा देताच कामे सुरू झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडून त्यात पाणी साचल्याने रस्त्याची झालेली चाळण, उखडलेली खडी, पडलेले खड्डे यामुळे होणारे अनेक अपघात यात अनेकांचे हकनाक प्राण गेले. संबंधित टोल प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होऊन
महामार्गाची अवस्था “जैसे थे” च असल्याने वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. संबंधीत घोटी टोल प्रशासनाला आदिवासी संघटनेचे नेते तथा घोटी बाजार समितीचे संचालक तुकाराम वारघडे यांच्या नेतृत्वाखाली योगेश चांदवडकर, पंडित खेताडे, रवि भागडे, नारायण बाबा जाधव, सागर टोचे, अनिल पढेर, पिंटू चव्हाण, छत्रु भागडे, किशोर जाधव, मनोज भगत, उल्हास गोईकणे, रमा शेख, विजय गायकर, शिवाजी तातळे, सागर बऱ्हे, प्रवीण खातळे, निलेश जगताप, सागर पढेर, अजय पारधी, बाळा डहाळे आदींनी टोल प्रशासनाला महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी पथदीप लावावे, सुचनाफलक तसेच आवश्यक असलेल्या बाबींची तात्काळ पुर्तता करून महामार्गाची दुरुस्ती करावी. न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा वारघडे यांनी देताच याची दखल घेऊन संबंधीत टोल प्रशासनाने महामार्गावरील खड्डे बुजवुन महामार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात केल्याने वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.
मुंबई आग्रा महामार्गावर मोठमोठे खड्डे पडुन पाणी साचल्याने खड्यांचा अंदाज येत नव्हता. यामुळे मोठमोठे अपघात होऊन अनेकांचे जीव गेले आहे. याबाबत टोल प्रशासनाला निवेदन देऊन सुचित करण्यात आल्यानंतर लगेचच महामार्गाची दुरुस्ती सुरू झाल्याने वाहनधारकांत समाधान व्यक्त होत आहे.
- तुकाराम वारघडे, संचालक बाजार समिती, घोटी
