स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतर अतिदुर्गम जामुंडे गावाला मिळणार पिण्याचे पाणी : भाऊराव भागडे, मनोहर वीर यांच्या प्रयत्नांनी स्वदेस फाउंडेशनतर्फे कामाला प्रारंभ

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असतांनाही मागील अनेक वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम जामुंडे ह्या आदिवासी गावाला पिण्याचे पाणी मिळत नव्हते. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना डोक्यावरून अनेक किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे जामुंडे गावातील महिलांसह ग्रामस्थ कमालीचे वैतागले होते. याबाबत मानवेढे जामुंडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. सरपंच मनोहर वीर, उपसरपंच भाऊराव भागडे आणि ग्रामविकास समितीच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल स्वदेस फाउंडेशनने घेतली आहे. अडीच किलोमीटर पाईपलाईन, पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्थेसाठी स्वदेस फाउंडेशनने जबाबदारी उचलली आहे. त्यानुसार आज सर्व कामांचे भूमिपूजन करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जामुंडे गावाला पाणी मिळणार असल्याने महिलांसह ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला.

जामुंडे गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी  मिटल्याने जनतेच्या चेहर्‍यावर याप्रसंगी हास्य उमटले. एक पाऊल विकासाकडे हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणारे उपसरपंच भाऊराव भागडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्वदेस फाउंडेशनचे ऋण व्यक्त केले. भूमिपूजन कार्यक्रमावेळी मानवेढे जामुंडे गावचे सरपंच मनोहर संतू वीर, उपसरपंच भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, स्वदेस फाउंडेशनचे तुळशीराम खंडळकर, दीपक जाधव, समन्वयक बिडकर, काशिनाथ आगीवले, शांताराम आगीवले, नेमिनाथ डोके, मोहन मनोहर, हसन आगीवले, भाऊ भले, लहानु भले, हरिभाऊ डोके, विलास डोके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वदेस फाऊंडेशनमार्फत पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे काम सुरू करण्यात आले आहे. अडीच किमी लांब पाईपलाईन, पाण्याची उंच टाकीचे बांधकाम होणार आहे. ह्या योजनेमुळे गावातील ८४ घरे व शेजारील वाड्या पाड्यावरील घराघरांपर्यंत पाणी उपलब्ध होईल. स्वदेस फाऊंडेशनचे ग्रामपंचायत मानवेढे, ग्राम विकास समिती व ग्रामस्थ यांच्यातर्फे आभार मानतो.
- भाऊराव भागडे, उपसरपंच मानवेढे जामुंडे

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!