नाशिकला राष्ट्रीय अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करावी : खासदार हेमंत गोडसे यांचे अन्न प्रक्रिया व उद्योग मंत्र्यांना साकडे

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

भारत देश हा कृषीप्रधान देश असून शेती निगडीत व्यवसायात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. याबरोबरच शेतपिकावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत नाशिक जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ८० टक्के कुटूबियांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. मात्र जिल्ह्यात शेत पिकांवर आणि फळांवर अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यंत्रणा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल परदेशात निर्यात करावा लागतो. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांवर आणि फळांवर प्रकिया केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक भरभराट वेगाने होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी केंद्र शासनाने नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करावी. असे साकडे आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना घातले आहे.
               

केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने अन्न प्रक्रियेची क्षमता असलेल्या पहिल्या चार राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असल्याचे स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यात भात, गहु, मका, बाजरी, कांदा या पिकांसह पालेभाज्या तसेच द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळांचे मोठया प्रमाणावर उत्पादन होत असते. कांदा आणि द्राक्ष या फळपिकांसाठी तर राज्यात नाशिक जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे. जिल्ह्यात अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान यंत्रणा नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या कच्चा मालावर प्रक्रिया करता येत नाही. परिणामी शेतकऱ्यांना आपला माल परदेशात निर्यात करावा लागतो. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक भरभराटीचा वेग मंदावला आहे. विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि शेतकरी समर्थक संघटनांनी पुढाकार घेवून खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे जिल्ह्यात अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून तगादा लावला आहे.
                       

शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून खासदार गोडसे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली. नाशिक जिल्ह्यात भात, गहु, मका, बाजरी, कांदा या पिकांसह पालेभाज्या तसेच द्राक्ष, डाळिंब, आंबा या फळांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असते. येथील शेतकऱ्यांचा शेतमाल परदेशात निर्यात होत असतो. याठिकाणी अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना केल्यास शेतकऱ्यांकडे असलेल्या कच्च्या मालावार प्रक्रिया करणे खुपच सोपे होईल. यातूनच शेतकऱ्यांना आर्थिक भरभराटीस निश्चितच चालना मिळणार आहे. जिल्ह्यात वाहतूकीसाठी लागणारी कनेक्टीव्हीटी मोठी असून याचा फायदा अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेला होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेवून केंद्र शासनाने नाशिक येथे अन्न प्रक्रिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करावी असे साकडे आज खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांना घातले आहे. अन्न प्रकिया आणि तंत्रज्ञान संस्थेची स्थापना करण्यासंबंधिचा आपला प्रस्ताव आला असून यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची ग्वाही अन्न प्रक्रिया व उद्योग विभागाचे मंत्री पशुपतीकुमार पारस यांनी खासदार गोडसे यांना एका पत्राद्वारे दिली आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!