पाडळी देशमुख येथील रेल्वेलाईन खालील मोरी रुंदीकरणाचा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून लागणार मार्गी

सरपंच खंडेराव धांडे व उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्या पाठपुराव्याला यश

प्रभाकर आवारी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १

पाडळी देशमुखच्या रेल्वेलाईनखालील मोरीच्या रुंदीकरणासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्या माध्यमातून पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी रेल्वेचे अधिकारी एस. सी. शर्मा यांच्यासमवेत समक्ष पाहणी करीत मोरीच्या ३ मीटरहुन ५ मीटरच्या रुंदीकरणासाठी रेल्वेच्या आधिकाऱ्यांना त्याबाबत कार्यवाहीचे आदेश दिले. रेल्वेचे अधिकारी एस. सी. शर्मा यांनीही तत्परता दाखवत लवकरच कामाची सुरवात करणार असल्याचे सांगितले. पाडळी देशमुखसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी संबंधीत अधिकारी, खासदार हेमंत गोडसे यांचे आभार मानले आहे.

नाशिक मुंबई महामार्गावरील पाडळी देशमुखमार्गे सिन्नर घोटी महामार्गाकडे जाण्यासाठी सोयीचा व जवळचा असणारा हा मार्ग आहे. या मार्गावर सुरवातीलाच असणाऱ्या रेल्वेलाईन खालील मोरीची रुंदी वाढवावी यासाठी पाडळी देशमुखचे सरपंच खंडेराव धांडे, उपसरपंच बाळासाहेब आमले यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, माजी सरपंच जयराम धांडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र घाटेसाव, रामभाऊ धोंगडे, यांच्यासह परिसरातील नागरिकांनी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या बाबींची दखल घेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, रेल्वेच्या नमाड सेक्शनचे मंडल अधिकारी एस. सी. शर्मा यांनी समक्ष पाहणी करून मोरीच्या रुंदीकरणासाठी तत्परता दाखवली. मोरीच्या या रुंदीकरणामुळे पाडळी देशमुख, शेणवड खुर्द, गरुडेश्वर, पुढील १२ वाड्या यांच्यासह तालुक्यातील पुर्व भागातील गावे व पंचक्रोशीलाही या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे नाशिक मुंबई महामार्ग ते सिन्नर घोटी या महामार्गाची जोडणी या मोरीच्या रुंदीकरणामुळे सोयीची होऊन दळणवळणाच्या दृष्टीने हा मार्ग जवळचा व सोयीचा होऊन वाहनधारकांसाठी मोठी सोय होणार आहे. यावेळी कचरू धांडे, हनुमंत गायकवाड, रतन धांडे, प्रल्हाद धांडे, ज्ञानेश्वर बोराडे, भगवान धांडे, प्रल्हाद धांडे, काका चौधरी, दत्तु गायकर, लखन धांडे, प्रल्हाद धांडे, अमोल धोंगडे, आदींसह नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!