यशाच्या कल्पना व्यवहारवादी बनवा !

पुरुषोत्तम आवारे पाटील ; संपादक, दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद –9892162248

आपल्या समाजात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होेणार्‍या व्यक्तींचा संबंध देव आणि दैवाशी जोडला जातो. व्यक्ती विविध क्षेत्रात यश का मिळवत जातात कारण नशिबाची त्यांना साथ असते म्हणून, नशिब, लक, प्रारब्ध आणि दैव ज्याला साथ देते त्याच्यात पदरात यश पडत असते असे पूर्वापार  मानले जाते. आपले संस्कारही तसेच सांगतात. एखाद्याने ढोर मेहनत केली आणि पदरी अपयश पडले तर त्याच्या नशिबातच यश नव्हते हा समज मजबूत होतो. प्रत्यक्षात प्रयत्न आणि नशिबाचा काहीही संबंध नसतो हे लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी रूढ झालेल्या काही म्हणी सुद्धा नव्याने बदलण्याची गरज आहे. प्रयत्न केल्यावर हमखास यश मिळतेच मात्र या प्रकाराला आपण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे म्हणत असतो; परमेश्वर हा अतिशय कठीण असा विषय आहे असे क्षणभर समजून चाललो आणि प्रयत्न केले तर कितीही कठीण काम असले तरी त्यात यश मिळते हा कदाचित या म्हणीमागचा अर्थ असावा.
बॅडलक, अनलक या सारख्या शब्दांचाही वापर समाजात सहज केला जातो. अनेकदा प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशावेळी या शब्दांचा वापर आपल्या सभोवताल काही लोकं करताना दिसतात. त्यावरून प्रयत्न आणि नशिबाचा काहीतरी संबंध असला पाहिजे असा संभ्रम आपल्या मनात तयार व्हायला लागतो. एखाद्या  विषयावर तीन-चार व्यक्ती सारखेच प्रयत्न करतात मात्र यश कुणाच्या तरी एकाच्या पदरात पडते तेव्हा यशस्वी व्यक्तीचा संबंध नशिबाशी जोडला जातो. चार लोकांनी केलेल्या प्रयत्नांची खरंतर अशावेळी कारणमिमांसा व्हायला हवी. नेमके असे प्रयत्न अनेकदा वेगवेगळ्या पद्धती वापरून केले जातात,ज्याला योग्य मार्गदर्शन मिळते तो यशाच्या अधिक जवळ पोहोचतो आणि कठोर परिश्रम करून देखिल प्रयत्नांची दिशा योग्य नसली की पदरात अपयश पडणार्‍या व्यक्ती नशिबाला दोष देवून मोकळ्या होतात. यशस्वी व्यक्तींचे अनुकरण समाजात मोठ्या प्रमाणावर केले जाते. यशस्वी नेता, व्यापारी, बिल्डर किंवा  कलावंत यांचे चाहते निर्माण होतात; त्यांनी जीवनात जे केले तसे करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रत्यक्षात यशस्वी व्यक्तीला आपल्या यशाचे गमक नेमके आहे कशात याची उत्तम जाणीव असते. अप्रामाणिकता आणि बेईमानी या अस्त्रांचा वापर करूनही अनेक लोक यशस्वी झालेले असतात, मात्र जगाला सांगताना  आपल्यावर असणारी दैवीकृपा आणि नशिबाची साथ याचा डांगोरा मोठ्या प्रमाणावर पिटला जातो. चाहत्यांची नेमकी इथेच गडबड होवू शकते. यशस्वी व्यक्ती जशी दिसते तशी ती प्रत्यक्ष जीवनात असेलच याची शाश्वती देता येवूू शकत नाही. अशा व्यक्ती बहुतांश दूहेरी व्यक्तीमत्त्व घेवून जगत असतात हे लक्षात घ्यायला हवे. मोठ्या, यशस्वी व्यक्तींच्या अतिशय जवळच्या वर्तुळात किंवा  किचन पयर्ंत वावरलेल्या अनेकांनी त्या त्या व्यक्तींबाबत आपल्या आत्मचरित्रात जे उल्लेख आजवर केले आहेत त्यावरून अशा मोठ्या व्यक्तींच्या दूहेरी व्यक्तीमत्त्व, नाटकी जगण्यावर प्रकाश पडला आहे. एखादा यशस्वी व्यापारी दिखाव्यासाठी दररोज दोन तास पूजेत घालवत असेल तर फार धार्मिक आणि सात्वीक व्यक्ती असेलच  असे नाही; दोन तास देवपूजा करणारा व्यापारी दिवसभर दुकानात वजनात बदमाशी करीत सामान्य माणसांच्या माना मोडताना हमखास दिसतो. याच न्यायाने विविध क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्ती लोकांना फसवून परोकाराचे नाटक करीत असतात. म्हणून यशाच्या कल्पना व्यवहारवादी तयार करून ह्या प्रसंगांचा सामना करण्याची नव्या पिढीला गरज आहे. उत्तम नियोजन, कठोर परिश्रम आणि त्यासाठी लागणारी जिद्द ज्या क्षेत्रात वारंवार वापरली जाते जाते तिथे यशाला येण्यावाचून आजवर कुणीही रोखू शकलं नाही. फक्त तुमच्या प्रयत्नातून प्रामाणिक हेतू दिसायला हवा. यश तुमच्याकडे येताना देव किंवा दैवाचा कोणताही वळसा घेवूून न येता थेट येवू शकते हे कायमचे लक्षात ठेवून प्रयत्नांची पराकाष्टा होण्याची गरज आहे. यशाच्या कल्पना डोक्यात तयार करताना कोणत्याही परिस्थितीत नशिब, देवाशी सांगड घालत स्वीकारणे हे मानसिक दूर्बलतेचे लक्षण आहे. ज्यांना पदोपदी कुठलेतरी आधार हवे असतात, त्यांच्याच मेंदूत देव, दैव असे विचार सतत फिरत असतात. यशाची कामना करणार्‍या  व्यक्तीने अशी जळमटे काढून टाकायला हवीत.

पुरुषोत्तम आवारे पाटील, संपादक दै. अजिंक्य भारत अकोला

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!