खेड जिल्हा परिषद गटात राजकीय हालचाली गतिमान : इच्छुकांनी सुरू केली चाचपणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

संभाव्य आरक्षण लक्षात घेऊन खेड गटात पक्षांतर व गटाची चाचपणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे। त्याचाच एक भाग म्हणजे नुकतेच संपतराव काळे यांनी समर्थकांसह केलेला काँग्रेस पक्ष प्रवेश बराच काही सांगून जातो. त्यांच्या बरोबर प्रामुख्याने पक्षप्रवेश केलेले दत्तू पाटील वाजे, ज्ञानेश्वर भोसले, रतन बांबळे आदी कार्यकर्ते पाहता आगामी निवडणुका चांगल्याच रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा विचार करता खेड गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून तालुकाध्यक्ष बाळासाहेब गाढवे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वाजे, शिवसेनेकडून उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, युवासेना तालुकाप्रमुख मोहन बऱ्हे, उपतालुकाप्रमुख समाधान वारुंगसे, काँग्रेसकडून संपतराव काळे,जेष्ठ नेते पंढरीनाथ बऱ्हे, जिल्हा नेते उत्तमराव भोसले हे तर भाजपकडून पांडुरंग बऱ्हे, नंदू गाढवे, खंडेराव झनकर अशा इच्छुकांच्या नावांची सगळीकडे चर्चा आहे.

ऐनवेळी शेकाप, मनसे यांचेही उमेदवार रिंगणात राहतील. इच्छुकांची उमेदवारी कापल्यास ते या पक्षांची किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गत निवडणुकीचा विचार करता खेड गट हा सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे प्रतिनिधित्व करतात. मागील निवडणुकीमध्ये शेकाप पुरस्कृत सुजाता सुनील वाजे या सदस्या होत्या. तर त्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब गाढवे या गटात सदस्य होते.

खेड गटातील मतदार नेहमी पक्षापेक्षा उमेदवार पाहून मतदान करतात. हे लक्षात घेऊन इच्छुक स्वतःच्या समर्थकांच्या संपर्कात राहून जमवाजमव करत असल्याचे दिसून येते.
इच्छुकांच्या भाऊ गर्दीत ऐनवेळी नवखे उमेदवारही आपले राजकीय भवितव्य आजमावण्यास प्रयत्नशील राहतील. त्यात प्रामुख्याने विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे समर्थक नारायण भोसले, महेश गाढवे, उमेश बऱ्हे ,भरवीरचे सरपंच अरुण घोरपडे, शिवसेनेकडून टाकेदचे उपसरपंच रामचंद्र परदेशी, निनावीचे सरपंच गणेश टोचे, गटप्रमुख साहेबराव झनकर हेही दावेदारी करू शकतात. ऐनवेळी धामणगावचे माजी चेअरमन पांडुरंग गाढवे यांचीही उमेदवारी नाकारता येत नाही. खेड गटातील गतिमान राजकीय हालचाली पाहता आगामी काळात राजकीय वातावरण तापून रणधुमाळी उठेल यात शंका नाही. पंचायत समित्यांच्या २ गणांतील आरक्षण काय असेल याची चाचपणी करून इच्छुक कोण असतील हे समजू शकेल.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!