अंधांसाठी औषधींवर विशिष्ट चिन्हांकित ओळखीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालणार : सौ. गावित
भास्कर सोनवणे, इगतपुरीनामा न्यूज, दि. २४
अंधांच्या आयुष्याचा प्रारंभ काळ्याकुट्ट अंधाराच्या जाणिवेतच झाला.. निसर्ग, व्यक्ती, सहकारी, शिक्षक, फुल आणि फुलपाखरे फक्त त्यांच्या अंधाऱ्या कोपऱ्यातील मनात आणि कल्पनेतच.. असे असले तरी कधीही न पाहिलेल्या अनेकानेक गोष्टी रंगांच्या किमयेतून कागदावर उमटविण्याची अंधांची जिद्द मात्र आकाशाएवढी…ह्या दिव्यांग अंध विद्यार्थ्यांनी स्पर्श, सुगंध आणि ध्वनीच्या मदतीने स्वतः इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे तैलचित्र रेखाटले आहे. रंगांना विशिष्ठ सुगंध देऊन रंग ओळख आणि विशिष्ठ मोजमापात रंग भरून व्यक्तीबाबतची तोंडी माहिती ह्यातून हे विशेष तैलचित्र निर्मित करण्यात आले आहे. स्पर्श, ध्वनी, सुगंध ह्यातून अंधांनी रंगवलेले हे चित्र निर्मला गावित यांच्या व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने न्याय देणारे आहे. अंध असूनही प्रचंड दिव्यदृष्टी लाभलेल्या माझ्या दिव्यांग अंध बांधवांची मी आयुष्यभर ऋणी राहील असे प्रतिपादन माजी आमदार निर्मला गावित यावेळी केले. सौ. गावित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनोखी जगावेगळी अविस्मरणीय भेट दिल्याबद्धल निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित, जिल्हा परिषद सदस्या नयना गावित यांनी अंध बांधवांचे आभार मानले आहेत. दरम्यान औषधे आणि गोळ्यांवर अंधांना समजेल अशी कोणतीही व्यवस्था नसल्याने अंधांची कुचंबणा होते. ह्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निर्णय घ्यायला विनंती करा असे आवाहन अंध विद्यार्थ्यांनी केले. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री महोदयांना भेटून याबाबत साकडे घालणार असल्याचे सौ. निर्मला गावित म्हणाल्या.
माजी आमदार निर्मला गावित यांचे हे चित्र रेखाटतांना मूळ चित्र-कलाकृतीच्या त्रिमिती प्रतिकृतीला परिमाण निर्माण करताना, त्यात ब्रेलसदृश स्पर्श ज्ञान, ध्वनी, सुगंध यांच्या माध्यम वापरले. त्यातून मूळ कलाकृतीची परिणामकारकता साधली गेली आहे. मुंबई येथील श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रंगगंध ह्या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग अंध मुले सध्या चित्रकलेचे प्रशिक्षण घेत असून, इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या माजी आमदार निर्मला गावित यांचे तंतोतंत तैलचित्र ह्या अंधांनी निर्मित केले आहे. सौ. गावित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या तैलचित्राची अनोखी भव्य दिव्य भेट सौ. गावित यांना सोपवण्यात आली. एवढ्या मोठ्या सन्मानाने माजी आमदार निर्मला गावित यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
चित्रकला ही फार लांबची गोष्ट म्हणता येईल. मात्र, हे आव्हान स्वीकारून अंध मुलांना रंगांच्या दुनियेची सफर घडवणाऱ्या श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट आणि रंगगंध संस्था आणि मार्गदर्शक सुमित पाटील यांचे विशेष कौतुक माजी आमदार निर्मला गावित यांनी केले. संस्थेने अंध मुलांना त्यांच्या कल्पनेतून अनेक वस्तूंची ओळख करून दिली. रंगांमागील भावना समजण्यासाठी कलर थेअरीचे प्रशिक्षण देण्यात आले. पेन्सिल, क्रेऑन्स, वॉटरकलरच्या माध्यमातून चित्रकला शिकवण्यात आले. रंगांच्या बाटल्यांवर ब्रेल लिपीतून रंगांची नावे लिहिली आहेत. टेक्स्चर पेंटिंग आणि स्प्रेचा वापर करून सध्या प्राथमिक शिक्षण दिले जात आहे. ठराविक आकार कापून ते कागदावर ठेवून त्याबाजूने स्प्रे पेंटिंग केले जाते. आगामी काही महिन्यात अंध दिव्यांग मुलांकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र साकारले जाणार आहे. हा कार्यक्रम इगतपुरीत घेतला जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी श्रीरंग चॅरिटेबल ट्रस्ट, रंगगंध संस्थेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.