इगतपुरीनामा न्यूज, दि. १२
इगतपुरी तालुक्यातील दिव्यांगांचे जनजीवन कोरोनामुळे विस्कळित झाले आहे. शासन दरबारी असलेल्या विविध योजनेचा लाभ सरकारी उदासिनेतेमुळे घेता येत नाही.
अनेक योजनेमध्ये पात्र असलेल्या दिव्यांगांना वेळेवर कागदपत्र जमा न केल्याने अपात्र करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या योजनांचे घरघंटी, घरकुल, कोविड अनुदान इत्यादी पात्र लाभार्थ्यांना वारंवार चकरा मारूनही खात्यावर अनुदान वर्ग होत नाही.
अनेकदा घरकुलाचे प्रस्ताव देऊन दिव्यांगांना प्राधान्याने घरकुल मंजूर होत नाही. ज्यांचे मंजूर झाले त्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही. प्रहार संघटनेकडून वारंवार पाठपुरावा करूनही सरकारी अधिकारी अत्यंत हलगर्जीपणाने दिव्यांग योजनेकडे कानाडोळा करतात. आदी समस्यांवर परिणामकारक तोडगा काढावा ह्या मागणीसाठी प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सभापती सोमनाथ जोशी यांना निवेदन दिले.
निवेदनात असेही नमूद आहे की, ग्रामपंचायतीमध्ये दिव्यांग निधी वेळेवर दिला जात नाही. दिरंगाई करणारे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना सूचना करण्यात याव्या, दिव्यांग मार्गदर्शन सल्ला केंद्र फक्त स्थापन करून नाहीतर ते कार्यरत करण्यात यावे. शासन निर्णयानुसार दिव्यांग हक्क कायद्यानुसार सर्वच सरकारी दप्तरामध्ये अंमलबजावणी करावी. आदी अनेक विषयांवर प्रहार दिव्यांग संघटनेने सभापती सोमनाथ जोशी यांना आज निवेदन दिले.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, उपाध्यक्ष सोपान परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष संतोष मानकर, सुभाष कडू, गणेश भागडे, उत्तम भोसले, शंकर सदगीर, सागर गावंडे उपस्थित होते.