प्रमोद परदेशी यांच्यासारख्या कर्तृत्ववान शिक्षकांमुळे शिक्षणाचा प्रसार सुलभ : ना. बाळासाहेब क्षीरसागर

प्रमोद परदेशी यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरित

इगतपुरीनामा न्यूज, दि. २०

नाशिक जिल्ह्यातील कर्तृत्ववान शिक्षकांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा प्रसार परिणामकारक झाला. नवनवीन उपक्रमांमुळे शिक्षकांची भूमिका विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी फायदेशीर ठरली. यामुळेच “टीव्हीवरच्या शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” अनेकांसाठी दिशादर्शक ठरला. प्रमोद परदेशी यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करतो असे गौरवोद्गार नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी काढले. कोरोना काळात राज्यातील शिक्षकांच्या स्तुत्य उपक्रमाची दखल घेऊन राज्यस्तरीय शिक्षक ध्येय मासिकाचे संपादक मधुकर घायदार यांच्या वतीने दिलेल्या कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार वितरणप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, इगतपुरी तालुक्यातील धामडकीवाडी ह्या अतिदुर्गम आदिवासी वाडीतील उपक्रम राज्यस्तरावर पोहोचल्याने नाशिक जिल्हा परिषदेला अभिमान वाटतो. प्रमोद परदेशी यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील शिक्षकांनी जिल्ह्याचे नाव अधिकाधिक उंचवावे असे ते शेवटी म्हणाले.

“शिक्षक ध्येय” तर्फे शाळा स्तरावर विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊन काळात राज्यातील उपक्रमशिल शिक्षकांना एकत्र करत राज्यस्तरीय ‘कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातून 200 पेक्षा जास्त नवोपक्रम शिक्षक सहभागी झाले. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामडकीवाडी शाळेने राबाविलेला टीव्हीवरील धामडकीवाडी शाळा उपक्रमाची निवड झाली.

कोरोना काळात शाळा बंद पण शिक्षण चालू उपक्रमात ऑनलाईनद्वारे शाळा शिक्षण देत होत्या. पण नाशिक जिल्ह्यातील धामडकीवाडी गावात मोबाईलला नेटवर्क नाही. तसेच पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अशा अतिदुर्गम वाडीतील मुलांचे शिक्षण अखंडित चालू राहण्यासाठी टीव्हीद्वारे अभिनव उपक्रम राबवून शिक्षण चालू ठेवले. वाडीत 3 टीव्ही माध्यमातून सुरु केलेला उपक्रम लोकांपर्यंत पोहचला. दानशूर लोकांकडून वाडीतील गावकऱ्यांना जुन्या टीव्ही भेट मिळाल्यामुळे प्रत्येक घरात हा उपक्रम पोहचला. मुलांसोबत पालकांचेही शिक्षण होऊ लागले. इगतपुरी तालुक्यात जवळ जवळ 45 गावात हा उपक्रम सुरु आहे. राज्यातील काही शाळांनी सुद्धा हा विद्यार्थीप्रिय उपक्रम सुरू केलेला आहे.

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते धामडकीवाडीचे शिक्षक प्रमोद परदेशी यांना कर्तृत्ववान शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ना. क्षीरसागर यांनी यावेळी धामडकीवाडी पॅटर्न सखोल समजून घेतला. याप्रसंगी कसबे सुकेणे जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, नाशिक जिल्हा सलून असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, त्र्यंबकेश्वरचे पत्रकार ज्ञानेश्वर महाले, योगेश सकाळे आदी उपस्थित होते. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रगत होण्यासाठी शिक्षक मनापासून प्रयत्न करीत आहे. या त्यांनी केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व शिक्षकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केल्याने इगतपुरीचे गटशिक्षणाधिकारी राजेश तायडे यांनी प्रमोद परदेशी यांचे अभिनंदन केले. मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास बोढारे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल बागुल, सिद्धार्थ सपकाळे, शिक्षक भारती संघटना विभागीय अध्यक्ष राजेंद्र दिघे, शिक्षक संघाचे इगतपुरी तालुकाध्यक्ष निवृत्ती नाठे, तालुका नेते उमेश बैरागी, इगतपुरी तालुका जुनी पेन्शन हक्क संघटनेचे वैभव गगे आदींनी प्रमोद परदेशी यांचे अभिनंदन केले.

ना. बाळासाहेब क्षीरसागर यांना”धामडकीवाडी पॅटर्न” समजून सांगतांना प्रमोद परदेशी.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!