
शाब्बास गुरुजी गौरव पुरस्कार व पुस्तक लोकार्पण सोहळा संपन्न
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९
इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील धामडकीवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राज्य आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांच्या ऐतिहासिक शैक्षणिक प्रयोगाला पुस्तकात मानाचे स्थान लाभले आहे. कोरोना महामारीमुळे शिक्षण क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाल्याने विद्यार्थी देशोधडीला लागल्याचे पाहून प्रमोद परदेशी यांनी “टीव्हीवरील शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न” निर्मित केला होता. आजही हा प्रयोग राज्यभरातील दुर्गम शाळांना मैलाचा दगड ठरला आहे. यामुळे शिक्षणाचा अखंडित झरा अतिदुर्गम भागात वाहत राहिला. या प्रयोगाची दखल सकाळ माध्यम समूहाच्या “शाब्बास गुरुजी” सदरात घेण्यात आली होती. सदराचे लेखक राजेंद्र दिघे यांनी लिहिलेल्या महत्वपूर्ण पुस्तकात प्रमोद परदेशी यांच्या “टीव्हीवरील शाळेचा धामडकीवाडी पॅटर्न”चा समावेश करण्यात आला आहे. प्रयोगाचे प्रणेते आदर्श शिक्षक प्रमोद परदेशी यांना आज शाब्बास गुरुजी पुरस्काराने विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शाळेत राबवलेले नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेच्या विकासासाठी राबाविलेले प्रयोग इतरांना मार्गदर्शक ठरतात. या हेतूने मालेगावचे लेखक, कवी, साहित्यिक व शिक्षक राजेंद्र दिघे यांनी प्रयोगशील शिक्षकांची प्रत्यक्ष शाळेत जाऊन माहिती घेतली. सकाळ समूहाच्या “शाब्बास गुरुजी” सदरात शिक्षकांच्या कामाचे लेखन करून समाजमाध्यमातून प्रसिद्धी दिली. महाराष्ट्रातील इतर शिक्षकांना यातून प्रेरणा मिळावी म्हणून लेखन पुस्तक रूपाने मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. चपराक प्रकाशन पुणे यांच्या माध्यमातून सुंदर पुस्तक अवतरले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मंत्रालयात शाब्बास गुरुजी पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. बालगंधर्व सभागृह मालेगाव येथे कृषीमंत्री दादा भुसे, साहित्यिक कमलाकर देसले, चपराक प्रकाशन पुणेचे संपादक प्रकाशक घनश्याम पाटील, शाब्बास गुरुजी फाऊंडेशनचे मार्गदर्शक संजय फतनाणी यांच्या उपस्थितीत पुस्तक लोकार्पण सोहळा संपन्न झाला. नाशिक जिल्ह्यातील विविध प्रयोगशील शिक्षकांना शाब्बास गुरुजी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
