नागोसली येथील पोलीस पाटलाच्या घरावर व गाडीवर हल्ला : पोलीस पाटील संघटनेच्या प्रयत्नाने ४ आरोपी जेरबंद

इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील नागोसली येथील पोलीस पाटील कुंडलिक ताठे हे रविवारी सायंकाळी वैतरणा नगर येथे सरपंच यांच्या समवेत चौकात बसलेले असताना रस्त्यावर काही युवक दारूच्या नशेत शिवीगाळ व हुल्लडबाजी करत होते. त्यावेळी सरपंच व पोलीस पाटील यांनी त्यांना विचारणा केली असता त्या तरुणांनी अर्वाच्च भाषेत पाटील यांना शिवीगाळ व दमबाजी केली. समजून सांगण्याचा प्रयत्न करत असताना ते तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांनी जवळच असलेल्या पोलीस पाटील यांच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. घरासमोर असलेल्या चार चाकी गाडीवर दगडांनी हल्ला करून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. ह्या घटनेबाबत घोटी पोलिसांना व गावकामगार संघटना पदाधिकारी यांना तात्काळ माहिती दिल्यानंतर कारवाईसाठी चक्रे फिरविण्यात आली. गावकामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अरुण पाटील बोडके, जिल्हाध्यक्ष रविंद्र जाधव यांनी घोटी पोलीस स्टेशन व पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांना माहिती देऊन कारवाई करण्यासंदर्भात मागणी केली. याची दखल घेऊन पोलीस अधिक्षक यांनी त्वरित घोटी पोलिसांना सांगून चार आरोपी ताब्यात घेतले. संबंधित ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पाटील यांना मदत करण्यासाठी संघटनेचे जिल्हा संघटक रोहिदास काळे पाटील, कैलास फोकणे, हरिश्चंद्र भागडे, सुभाष कोरडे, ज्ञानेश्वर धोंगडे यांनी विशेष सहकार्य केले.

error: Content is protected !!