इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून उद्या दि. २१ सप्टेंबरपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांचे काम थांबणार आहे. यामुळे जमिनी आणि मालमत्तांची खरेदी, विक्रीसह नोंदणीची सर्व कामे बंद असणार आहेत. बेमुदत संप असल्याने जनतेची आणि पक्षकारांची गैरसोय होणार असून आमच्या न्याय्य मागण्यांसाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांनी केले आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी शासनाकडे मागील काही वर्षापासून विविध मागण्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले आहेत. मात्र मागण्यांची पूर्तता होत नाही. म्हणून उद्यापासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नोंदणीचे काम ठप्प होणार आहे.
संघटनेकडून विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील मागील पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या पदोन्नत्या त्वरीत करणे, पदोन्नतीची कार्यवाही पुर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू करू नये, विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोरोनामुळे मयत झालेले विभागातील अधिकारी/कर्मचारी यांच्या वारसांना तात्काळ ५० लाखाची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीला अनुकंपा तत्वावर विभागात नोकरीत सामावून घेणे, मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांची पदे विभागातील पदोन्नतीने भरणे, स्विय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कार्यालयांच्या व जनतेच्या सुविधेकरीता वापरणे, तुकडेबंदी तसेच रेरा फायद्यान्वये नोंदणी विभागतील अधिकारी/कर्मचारी यांचेवर करण्यात आलेल्या कार्यवाह्या मागे घेणे, हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविणे, आय सरिता, ई-फेरफार तसेच इतर सर्वरच्या अडचणी तात्काळ दूर करणे, आयकर विभागाकडील विवरण पत्र, पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या माहिती केंद्रीय सर्व्हरवरून पुरविणे, नोंदणी अधिकारी यांच्याविरुध्द विनाकारण दाखल होणारे गुन्हे मागे घेणे, नवीन आकृतीबंधानुसार शिपाई संवर्गातील पदे निरसित न करता कायम ठेवणे, निनावी व त्रयस्थ व्यक्तीद्वारे होणाऱ्या तक्रारीच्या आधारे कार्यवाही प्रस्तावित न करणे, सह दुय्यम निबंधक वर्ग-२ व दुय्यम निबंधक श्रेणी-१ संवर्गाचे एकत्रीकरण करणे, पदनामामध्ये बदल करणे, विभागीय पदोन्नती समितीमध्ये संघटनेचा एक प्रतिनिधी घेणे, खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेणे, विभागीय चौकशीची कार्यवाही विहीत मुदतीत पार पाडणे, सर्व संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांचे गोपनिय अहवाल दरवर्षी विहीत मुदतीत प्राप्त करून घेवून अद्ययावत ठेवणे, शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही करतांना त्या वर्षी रिक्त असलेली पदे त्याच वर्षात भरणे, बदल्या करतांना संघटनेस विचारात घेणे इत्यादी मागण्या निवेदनात नमूद आहेत.
यासह शासनाकडून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत. सदरच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी यापुर्वीच घोषीत केल्याप्रमाणे उद्या दि. 21पासून बेमुदत संप पुकारण्याचा निश्चय केलेला आहे. त्या अनुषंगाने जनतेला/पक्षकारांना कोणत्याही प्रकारची गैरसोय/त्रास होवू नये यासाठी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे बेमुदत संपाबाबत कळवले आहे.