माजी आमदार शिवराम झोले, गोरख बोडके यांनी घेतली शरद पवारांची भेट : इगतपुरीतील शेतकरी पीक विम्यापासून वंचित प्रकरणी पालकमंत्री काढणार तोडगा

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

शेतकरी खेड्यात राहत असल्याने त्यांना ऑनलाईन अर्जाबाबत आणि शिक्षण कमी असल्याने शेतकऱ्यांना विमा कंपन्यांच्या नियमांचे ज्ञान नाही. सरकारी प्रकियांची माहिती सुद्धा शेतकऱ्यांना नसते. यामुळे विमा कंपन्यांची नियमावली त्यांच्यापर्यंत पोहचत नाही. असे असताना अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या पिकाचा विमा भरलेला आहे. मात्र शेतकऱ्यांनी पूर्णपणे विमा कवच जरी केले असले तरी अधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती नाही. आजपर्यंत किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला याची माहीती कोणाला मिळत नाही. याबाबत इगतपुरीचे माजी आमदार शिवराम झोले व उपसभापती गोरख बोडके यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, पिकविमे मिळावे  अशी मागणी त्यांनी केली आहे. भेटीवेळी शरद पवार यांनी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना दूरध्वनीद्वारे बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत सूचना दिल्या.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान होवूनही विम्याची रक्कम न मिळालेले शेतकरी बहुसंख्येने आहे. याबाबत इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची आणि भारत एक्सा या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्तिक बैठक देखील झाली होती. मात्र अजून पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे अधिकारी काय करतात असा प्रश्न पडला आहे. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात पिकांचे नुकसान होवून आठ महिने उलटले तरी विमा कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे ७२ तासांमध्ये कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली नाही. असे कारण सांगत विमा कंपनीने हजारो शेतकऱ्यांचे क्लेम नाकारून शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. ऑनलाईन तक्रार केलेले नसली तरी शासनाच्या महसूल, कृषी विभागाकडून सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मात्र झालेले आहेत. तरी देखील बरेच शेतकरी विम्या पासून वंचीत आहेत.

माजी आमदार शिवराम झोले आणि बाजार समितीचे उपसभापती गोरख बोडके यांनी शरद पवार यांच्याकडे ह्याप्रकरणी भेटीत चर्चा केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून लवकरच पालकमंत्री यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत अंतिम तोडगा काढण्यात येईल असे श्री. पवार यांनी आश्वासन दिले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!