संदीप कोतकर, इगतपुरीनामा न्यूज, दि. २५
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या उपचारांसाठी इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. सुरुवातीस मिळणाऱ्या चांगल्या सुविधांमुळे येथील रुग्णांवर उत्तम उपचार केले जात होते. सद्य:स्थितीतही उपचार चांगले होत असले, तरी भिंतीवरुन ओंघळणारे पावसाचे पाणी, लोंबकळणारे स्विच अन् वायरिंगमुळे रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. तिसऱ्या लाटेचा धोका बालकांना होणार असल्याचे सांगितले जात असताना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाच्या बालगृहातील स्लॅबच्या छताला पडलेला ढपल्यामुळे रुग्णांमधील भीती अधिक गडद झाली आहे. बालगृहाबरोबरच ऑपरेशन थिएटर, प्रसूती गृह, जनरल वार्ड, औषध गृहाचीही हीच परिस्थिती आहे.
प्रसूतीगृह, बालरोग, ऑर्थोपेडिक सर्व प्रकारच्या जनरल शस्त्रक्रियांसह येथे उपचार केले जातात. सर्व उपचार नाममात्र शुल्कांमध्ये होत असल्याने येथे रुग्णांची नेहमीच वर्दळ असते. दैनंदिन ओपीडीद्वारे १५० ते २०० रुग्णांवर उपचार केले जातात. तर ७० ते ८० निवासी रुग्णांवर उपचार केले जातात. यामध्ये प्रामुख्याने गोरगरीबांची संख्या लक्षणीय असते. खासगी हॉस्पिलमध्ये उपचारांसाठी लागणारा भरमसाठ खर्च अधिक असल्याने शहरातील अनेक कनिष्ठ मध्यमवर्गीय ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतात. पण येथील परिस्थितीवरून येथे येणारे सर्व रुग्ण भीतीच्या छायेखाली वावरत असल्याचे चित्र आहे.
रुग्णालयाच्या मुख्य इमारतीच्या अनेक भिंतींवर वायरिंग लोंबकळत असून लाईटच्या ट्यूब कोणत्याही क्षणी खाली पडण्याची शक्यता आहे. पावसाचे पाणी भिंतीवरुन खाली पडत असल्याने रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी पाणी साचते. तर बालगृहातील स्लॅबच्या छताचा ढपला पडल्यामुळे रुग्णामध्ये अधिकच भिती निर्माण झाली आहे. सुदैवाने काही दिवसांपूर्वी स्लॅबच्या छताचा ढपला पडताना बालगृह विभागात रुग्ण नसल्याने अनर्थ टळला. असे असले तरी यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला सुविधांसाठी रुग्णालयाने अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. प्रस्तावही मंजूर झाला,टेंडरही निघाले पण सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्त आहे. दरम्यान, बांधकाम विभागाचे अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
आम्ही या समस्येविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी कळवले आहे. मात्र दुरुस्ती होत नाही. रुग्णांसह आमच्या कर्मचारी व अधिकारी यांचा देखील जीव धोक्यात आहे.
- डॉ स्वरुपा देवरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय इगतपुरी