लेखन – डी. डी. धोंगडेपाटील
तालिबान्यांनी ज्या प्रकारे अफगाणिस्तान ताब्यात घेतले ते पाहता एक संदेश तर निश्चित पोहचलाय की, आजही अशाप्रकारे आक्रमण करून देशावर कब्जा करता येऊ शकतो ! मग ते कोणी कितीही मोठे राष्ट्र असले तरी त्याने गाफील राहता कामा नये. कारण जाहीर आणि कट्टर शत्रू असलेले पाकिस्तान आणि उघड नसले तरी सर्वश्रुत असलेले चीनसारखे मोठे शत्रू तसेच इतर मुस्लिम राष्ट्र असे मिळून सुद्धा ह्या कोणत्याही देशावर कब्जा होऊ शकतो. अर्थात आमच्या देशाचा शौर्याचा इतिहास बघता ते धाडस शक्यतो आजतरी कोणी करू शकत नाही. मात्र तरीही गाफील राहता कामा नये हे माझे स्पष्ट मत आहे.
केवळ सत्तेसाठी, स्वार्थासाठी अशी जीवघेणी आक्रमणे बघितली की अनेक प्रश्न उपस्थित होतात. जगातील थोर विचारवंत, समाजसुधारक, प्रबोधनकार, किर्तनकार तसेच धार्मिक – आध्यात्मिक कार्य करणाऱ्यांनी, प्रत्येक धर्म-सांप्रदायाच्या वरिष्ठांनी आपल्या ज्ञान, स्थिती, प्रतिष्ठेद्वारे एकत्र यायला हवे. संपूर्ण जग एकसंध कसे होईल, संपूर्ण जगात शांतता कशी प्रस्थापित होईल, सर्व जातीधर्माच्या पलीकडेही मानवता हीच एकमेव जात राहून सर्वजण एकमेकांप्रती प्रेम, आदर, सन्मानाने कसे वागेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपली संपूर्ण कुशलता, ताकद याकामी वापरली पाहिजे.
जगाला युद्ध नव्हे बुद्धाचा संदेश दिला पाहिजे. बुद्ध “संपूर्ण विश्वाला मानवतेचा, प्रेमाचा, मैत्रीचा, करूणेचा, समतेचा, विश्वबंधुतेचा संदेश देतात. हा संदेश प्रत्येकाने आत्मसात करण्याची गरज आहे. आणि असे होत नसेल तर आजचा मानव तंत्रज्ञानाने कितीही प्रगत झाला असला तरी तो बौद्धिक दिवाळखोर, अज्ञानी-अनपढच असेल असे माझे ठाम मत आहे. सर्वशक्तिमान, बुद्धिजीवी एक माणूसच दुसऱ्या माणसाच्या प्राणासाठी असा व्याकुळ असेल तर मग आपल्यापेक्षा ते हिंसक, जंगली प्राणी किंवा कुत्रे, मांजरे, उंदीर बरी हे संतापाने म्हणावेसे वाटते.
युद्ध हे माणसाने माणसाचा जीव घेण्याचे नसावे तर युद्ध हे गरिबीविरूद्ध हवे. युद्ध हे भूकबळी विरूद्ध हवे. युद्ध हे रोज ऐकायला येत असलेल्या नवनवीन आजारांविरूद्ध हवे. युद्ध हे लाचारी, गुलामी, भ्रष्ट्राचार, स्वार्थ याविरूध्द हवे. युद्ध हे राग, द्वेष, तिरस्कार, आळस, अज्ञान, अंधश्रद्धा, शत्रुत्व अशा विचारांविरूद्ध हवे. संपूर्ण जगातील ८०० करोडच्या आसपास असलेल्या प्रत्येक मानवाने जाती, धर्म, सांप्रदाय, संघटना, भेदभाव बाजूला ठेवून प्रेम, सद्भावना, सन्मान, शांतीने जीवन जगावे हीच अपेक्षा अफगाणिस्तानच्या प्रकरणावरून बोध ठरते.