
इगतपुरीनामा न्यूज – स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी अविरत प्रयत्न, प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षा, त्यांचा अभ्यासक्रम, मुलाखत व निवडपद्धती याविषयी सविस्तर माहिती गरजेची आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण जास्त आहे याला ग्रामीण तरुणांचा प्रामाणिकपणा व कष्टाळूपणा या गोष्टी उपयुक्त ठरल्या आहेत. यशासाठी ध्येयवेडे होऊन प्रयत्न केल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन इगतपुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन बनकर यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित इगतपुरी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागांतर्गत कार्यक्रम झाला. यावेळी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर श्री. बनकर बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलीस दल भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक व शारीरिक पात्रता, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम व मैदानी चाचणी, सायबर सुरक्षितता याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक सहा. प्रा. आर. इ. नाडेकर यांनी तर सूत्रसंचालन सहा. प्रा. एस. एस. सांगळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या पी. डी. हिरे अध्यक्षीय भाषणावेळी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून ध्येय प्राप्तीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत. महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. बी. एच. घुटे यांनी विद्यार्थ्यांसमोर आजीवन अध्ययन ही संकल्पना स्पष्ट केली. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.