घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक मंडळात ३ नवे चेहरे

वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

जिल्ह्यात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत गेल्या दिड वर्षापुर्वी संपुष्टात आलेली आहे. मात्र विविध कारणांनी संचालक मंडळास तीन वेळा मुदतवाढ मिळाली होती. बाजार समितीच्या निवडणुकीकडे संपुर्ण तालुक्याचे व सहकार क्षेत्राचे लक्ष लागले असतानाच पणन व सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासक नियुक्त केले आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने  प्रशासक मंडळ कारभार पाहत आहेत. अँड. संदीप गुळवे, अनिता बोडके यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली आहे. आज ३ नव्या चेहऱ्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नाने प्रशासक म्हणून संधी मिळाली आहे. ह्यात काशिनाथ कोरडे, नामदेव भोसले, भगवान भोईर यांचा समावेश आहे.

घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा तीन नवीन प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी जि. प. सदस्य जनार्दन माळी, केरु दादा खतेले, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, वसंत भोसले, वासाळीचे माजी सरपंच लक्ष्मण कोरडे, शांताराम कोरडे, विजय कोरडे, माजी पंचायत समिती सदस्य नामदेव साबळे, लक्ष्मण धांडे व जनार्दन झडे आदी उपस्थित होते.