इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्र राज्यभरातील नाभिक बांधव आणि व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. भाड्याने घेतलेली दुकाने आणि घरे यामुळे उत्पन्नहीन झालेल्या नाभिक बांधवांना शासनाकडून कोणतीही मदत आणि दिलासा दिला गेलेला नाही. यामुळे नाभिकांमध्ये शासनाबाबत तीव्र स्वरूपाचा असंतोष उग्र स्वरूप धारण करीत आहे. इतर प्रवर्गासाठी शासनाने पुढे येऊन दिलेली मदत नाभिक बांधवांना लागू नसल्याने नाभिक समाज अस्वस्थ आहे. रोजीरोटी संकटात असल्याने उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाच्या प्रश्नांनी आत्महत्येचे विचार येऊ लागले आहेत. ह्या विदारक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नाभिक बांधवांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी सकल नाभिक समाज, सलून असोसिएशनच्या इगतपुरी तालुका व नाशिक जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात “केश शिल्पी बोर्डाचे” पुनर्गठन करून ह्या बोर्डाला लवकरात भरीव निधी उपलब्ध करावा, नाभिक बांधवांना तातडीने आर्थिक सहाय्य करावे, नाभिक समाजाला आर्थिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक दृष्ट्या स्थिर करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, कोविडमुळे राज्यातील सर्वांचे हाल होत आहे. त्यामुळे शासनाकडून असंघटित कामगार, रिक्षा चालक, घर कामगार स्त्रिया, बांधकाम मजूर यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. मात्र यामधून नाभिक समाजाला दुर्लक्षित करण्यात आले आहे. दीड वर्षांपासून नाभिक कारागिर आणि दुकानदार टाळेबंदी, संचारबंदीने हातावर हात ठेवून आहे. आर्थिक उत्पन्न शुन्य असून वाढती महागाई ह्यामुळे त्यात भर पडलेली दिसते. भाड्याने घेतलेली सलून दुकाने, घरे थकित भाड्यांमुळे मालकांकडून रिकामी केली जात आहेत. काही त्यासाठी तगादा लावत आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे दर आटोक्याबाहेर गेल्यामुळे नाभिक समाजातील सलून व्यावसायिकांच्या मुलाबाळांना कसे जगवावे हाच मुलभूत प्रश्न उभा राहिला आहे. यामुळे दीड वर्षात किमान २७ नाभिक सलून कारागिर व दुकानदारांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याने त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले. त्या कुटुंबियांना शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. नाभिक समाज बलुतेदारांमध्ये अंतर्भूत असल्याने आर्थिक उत्पन्न फार कमी आहे. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात भूमिहीन आहे, त्यामुळे यांचे हातावरील पोट असून रोजच्या रोज कमवा आणि जगा हे नशिबी आलेले आहे.
ह्या पार्श्वभूमीवर शासनाने केश शिल्पी बोर्डाचे पुनर्गठन करून कार्यालयांचा पत्ता व अध्यक्ष जाहीर करावे. या माध्यमातून नाभिक समाजाला अल्प व्याजदरात व अनुदानाने कर्जपुरवठा होऊ शकतो. यासह विमा लाभ, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना अल्पदरात शैक्षणिक कर्ज, गर्भवती स्त्रियांना प्रसुती खर्च, ५५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मासिक निवृत्ती वेतन व इतर लाभ मिळू शकतील. नाभिक व्यावसायिकाना सलूनसाठी जागा किंवा गाळा उपलब्ध करून देण्याचं काम केश शिल्पी बोर्डामार्फत करावे. अध्यक्ष व बोर्ड कार्यकारिणीची निवड नाभीकांमधून व्हावी. राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशात केश शिल्पी बोर्डाचे काम चालू आहे. त्यानुसार सरकारने तातडीने दखल घ्यावी. ज्या नाभिकांची स्वमालकीची दुकाने घरे आहेत त्यांना वीज, संपत्ती कर, पाणीपट्टी आदी शासकीय देणी किमान दोन ते तीन वर्षे माफ करावीत. ज्यांची घरे दुकाने भाडेपट्ट्यांची आहेत त्यांना भाड्यांमध्ये सवलत द्यावी. लॉकडाऊन काळात नाभिक व्यावसायिक, कारागीर यांच्या आत्महत्या झाल्या त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने तात्काळ आर्थिक मदत करावी. महाराष्ट्राने नेहमीच सामाजिक बांधिलकी स्विकारुन जनतेच्या उत्थानासाठी परिश्रम घेतले आहेत. त्यानुसार नाभिक समाजाला मदतीचा हात द्यावा.नाभिक बांधवांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार व्हावा.आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या सकल नाभिक समाजाला न्याय, हक्क व अधिकार मिळवून द्यावा आदी मागणीची दखल सरकारने घ्यावी असे निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे.
निवेदनावर नाशिक जिल्हाध्यक्ष एकनाथ शिंदे, प्रदेश संपर्कप्रमुख पंढरी आंबेकर, जिल्हा उपाध्यक्ष निवृत्ती आंबेकर, इगतपुरी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र कोरडे, जिल्हा संघटक अशोकराव सुर्यवंशी, जिल्हा संपर्कप्रमुख अक्षय दळवी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रेवणनाथ सोनवणे, कायदेशीर सल्लागार ॲड. सुनिल कोरडे, तालुका उपाध्यक्ष गणेश रायकर, विशाल कदम, सचिव किरण कडवे, सहसचिव अनिल सुर्यवंशी, तालुका संपर्कप्रमुख कैलास जाधव, भुषण डाके, राजाराम बिडवे, खजिनदार प्रविण काशीकर, तालुका संघटक प्रदीप कडवे, योगेश कोरडे, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण सोनवणे, तालुका सोशल मिडीया प्रमुख आदेश जाधव, गणेश गेणू रायकर, तालुका प्रसिध्दी प्रमुख सुनिल वाघमारे, तालुका संघटक योगेश आंबेकर, सल्लागार गणपत रायकर, सुर्यकांत कोरडे, इगतपुरी शहराध्यक्ष संजय सोनवणे, शहर उपाध्यक्ष सोमनाथ साळुंके,शहर सचिव नितीन सोनवणे, संपर्क प्रमुख नवनाथ सोनवणे, सोशल मीडिया प्रमुख संकेत कोरडे, शहर प्रसिद्धी प्रमुख मयूर अनारे, शहर संघटक मयूर भराडे, शहर खजिनदार ज्ञानेश्वर नानासाहेब रायकर, सामाजिक कार्यकर्ते अमोल हिरामण कडवे, वैभव कोरडे, अनिल कोरडे, सदस्य रवी सूर्यवंशी, सदस्य अमोल कोरडे आदींच्या सह्या आहेत.