इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने सर्वांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करणे आवश्यक असून राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ यातील विद्यार्थ्यांनी यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाजाचे संचालक भाऊसाहेब खातळे यांनी केले.
इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी भाऊसाहेब खातळे बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वश्री शांताराम कोकणे, कचरू डुकरे, सुनिल रोकडे, पांडुमामा शिंदे, वैशाली आडके, पंढरीनाथ बऱ्हे, जयंत गोवर्धने, अर्जुन शिंदे, भगवंता खांडबहाले, कृष्णा चौधरी, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड उपस्थित होते.
श्री. खातळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की महाविद्यालयीन युवकांनी सामाजिक कार्यात सहभागी होऊन पर्यावरण, स्वच्छता, शिक्षण, अंधश्रध्दा या संदर्भात जनतेत जाऊन प्रबोधन केले पाहिजे. याप्रसंगी पांडुमामा शिंदे, कचरू डुकरे, प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. भाबड यांनी आपल्या भाषणात स्वच्छता पंधरवाडा या उपक्रमाविषयी माहिती देऊन यात मोठया प्रमाणात महाविद्यालयीन युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी केले. एनसीसी प्रमुख प्रा. एस. एस. परदेशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी. सी. पाटील, प्रा. के. के. चौरसिया, प्रा. एस. के. शेळके, विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा. आर. एम. आंबेकर, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.