
इगतपुरीनामा न्यूज, दि. १९ – इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील इंदिरानगर परिसरात एका घरावर पोलिसांनी छापा टाकून सहा ते सात किलो गांजा हस्तगत केला आहे. घराची झाडाझडती घेतली असता घरात गावठी कट्टा आढळून आला आहे. पोलीसांनी गावठी कट्टा जप्त केला आहे. ह्या गुन्ह्यातील संशयित आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आणि अवैध धंदे बंद केले जात आहेत. पोलिसांच्या धडक कारवाईमुळे गुन्हेगार धास्तावले असून सामान्य नागरिक मात्र सुखावले आहेत.