व्हिटीसी ते साकुरफाटा भागातील जमिनी समृद्धीसाठी देण्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध : बळजबरीने संपादन केल्यास आंदोलन करण्याचा कृती समितीचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

मुंबई नागपुर समृध्दी महामार्गासाठी नव्याने संपादित करण्यात येणार असलेल्या सर्व गावांतील शेतकऱ्यांनी जमीन संपदन करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. बळजबरीने जमिनी संपादित केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समितीने नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना आज निवेदन दिले. इगतपुरी तालुक्याला विविध प्रकल्पाच्या माध्यमातून कायमचे संपवण्याचा घाट घातला गेला असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे. दरम्यान बाधित गावांमध्ये शेतकऱ्यांमध्ये बैठका सुरू झाल्या असून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जात आहे.

इगतपुरी तालुक्यातील साकुर, नांदगाव बुद्रुक, नांदुरवैद्य, बेलगांव कुऱ्हे, कुऱ्हेगांव, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे या समृध्दी जोड महामार्गास जमिनी संपादन करण्यात येणार आहे. याबाबत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ह्या परीसरात तीव्र संताप व्यक्त झाला. जमिनी संपादन करण्यास विरोध असल्याने शेतकरी एकत्र होऊन पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली. आगामी काळात ह्या जोडरस्त्यामुळे शेतकरी आणि शासन असा तीव्र संघर्ष उभा राहणार आहे.    शेतकऱ्यांचा विरोध असल्याने शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकरी कृती समिती सक्रिय झाली आहे.

इगतपुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी मोठया प्रमाणात जमिनी विविध प्रकल्पांसाठी संपादित झालेल्या आहेत. लष्कर, महामार्ग, विविध धरणे, रेल्वे, औद्योगिक कंपन्या, रस्ते, समृध्दी महामार्ग, फिल्म सिटी आदी कारणांसाठी जमिनी संपादन झालेल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर जमिनी संपादित करुन आधीच मोठा अन्याय केलेला आहे. साकुर ते व्हिटीसी फाट्यादरम्यान होणाऱ्या समृध्दी महामार्ग जोड रस्त्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी आधिग्रहीत होणार आहेत. याबाबत १५ जुनला अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नांदुरवैद्य, बेलगांव कुऱ्हे, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे, कुऱ्हेगांव, साकुर येथील उत्कृष्ट दर्जाची जमीन समृध्दी महामार्ग जोड रस्त्यासाठी संपादन होणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या जमिनी आधिग्रहित करणार असल्याच्या सुचना जारी झालेल्या आहेत.

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना दिलेल्या निवेदनावर विदर्भातील माजी आमदार सरोज काशीकर, अर्जुन बोराडे, शंकर ढिकले, शंकर पुरकर, उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख बाळासाहेब धुमाळ, रामनाथ ढिकले, भानुदास ढिकले, शेतकरी संघटनेचे इगतपुरी तालुकाध्यक्ष किसन शिंदे, उत्तम सहाणे, यादव सहाणे, माजी सरपंच तुकाराम सहाणे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मनोज सहाणे, रतन सहाणे, साकुरचे सरपंच विनोद आवारी, शिवाजी पागेरे, सुभाष गायकर, अमृता सहाणे, जेष्ठ नेते काशीनाथ तांबे, नारायण गायकर, साहेबराव धोंगडे, माजी सरपंच संतोष गुळवे, संतोष विष्णू गुळवे, शशिकांत भदाणे, रामचंद्र बापू पाटील आदींच्या सह्या आहेत. आगामी काळात शेतकरी तीव्र संघर्ष करणार असल्याचे दिसून येत आहे.

निवेदनाच्या प्रती इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, नाशिकचे ग्रामीण पोलीस अधिक्षक सचिन पाटील, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी, इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे, वाडीवऱ्हेचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, इगतपुरी पोलीस निरीक्षक समाधान नागरे, घोटी पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांना पाठवण्यात आला आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!