शिव प्रॉडक्शन धनराज म्हसणे प्रस्तुत : “किवटी” – दिशा राजकारणाची हत्या आरक्षणाची
इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या मांडणीवर देश उभा राहिला, घडला आणि विकसितही झाला. त्यासाठी अनेक कायदे आले, दुरुस्त्या झाल्या. काही योजना लोकसहभागातुन तर काही कायदे कड़क करून राबविण्यात आले. उद्देश एकच की देशातील सर्वसामान्य जनतेचा उत्कर्ष व्हावा. समाजाचा कुठलाही घटक वंचित राहता कामा नये. परंतु प्रस्थापित सत्ताधारी वर्ग वर्चस्व राखण्याच्या शर्यतीत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. विविध मार्गांनी कायद्यातील पळवाट शोधून परिस्थितीचा आपल्या फायद्यासाठी वापर करत सत्तेचे राजकारण गावोगावी वर्षानुवर्षे खेळले जात आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येत हे वास्तव जगासमोर मांडण्यासाठी समाजातील सर्वात प्रभावी माध्यम निवडले. त्यानुसार ह्या विषयावर एका लघु चित्रपटाची निर्मिती सुरू आहे. चित्रपट निर्मितीचे काम म्हणजे एक खर्चिक कलाकृती आहे. परंतु अगदी साधारण परिस्थिती असतानाही धनराज म्हसणे ह्यांची तारेवरची कसरत सुरू आहे. त्यांनी सर्वांना एकत्र आणून उत्कृष्ट कलानिर्मिती केली. ह्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतुन कौतुक केले जात आहे.
आदिवासी समाजाचे साधेभोळे जीवन पण राजकारण्यांद्वारे त्यांची होणारी होरपळ आणि जिव्हारी लागणारी कथा किवटी ह्या लघुपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्माते धनराज म्हसणे दिग्दर्शित किवटी ह्या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन निलेश भोपे यांचे असून काळजाचा ठाव घेणारे आहे. ह्यात मुख्य भूमिकेत बाळा दुभाषे, मंगला बच्छाव, हेमा गाडेकर, सुनिल नागमोती, सुदाम शिंदे, काजल म्हसणे, सौरभ भांगरे, ज्ञानदेव जोशी, गणेश बोराडे, तानाजी मुकणे, दत्ता रूपवते, विनय खारे, बंटी जाधव, हिराबाई गीते, बाबुराव हालदे, रमेश तांगडे आदी कलाकारांचा सहभाग आहे. चित्रीकरण सुनिल शिंदे, प्रकाश भागडे व सुनील चव्हाण तसेच संपादन निगळ स्टूडीओ ह्यांनी केले आहे. ही कलाकृती साकारताना पडद्यामागून तुळशीराम म्हसणे, किशोर म्हसणे, कार्तिक म्हसणे, रवी महाराज गुंजाळ, मंगेश भागडे, गणेश मेमाणे, वैभव गगे, ईश्वर चव्हाण, अनिल भोपे ह्यांचे विशेष सहकार्य आणि प्रशांतशेठ कडु ह्यांचे आर्थिक पाठबळ लाभले. ‘किवटी – दिशा राजकारणाची हत्या आरक्षणाची’ ह्याअर्थी समाजजीवनावर प्रकाश टाकणारा हा गावोवागी चालणारे राजकारण उघड करणारा लघुपट आहे असे दिग्दर्शक आणि निर्माते धनराज म्हसणे ह्यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष झाल्यावर लोकशाहीच्या अमूल्य पद्धतीत देशाची व्यवस्था उभी राहिली खरी; प्रत्येक तळागाळातील घटकांना सामवुन घेताना काही कायदेही झाले. पण प्रस्थापितांच्या मुजोरीने प्रत्येकवेळी नितिमत्तेला पायदळी तुडवुन सत्तेच्या महाकांडात सर्वसामान्यांचाच बळी दिला गेला. ज्या सर्वसामान्यांना ह्या सगळ्याशी कसलही सोयरसूतक नाही अशांचा, कायद्यातील पळवाटा शोधून सत्तापिपासु आपल्या फायद्यासाठी नेहमीच वापर करत आपली सत्तेची पोळी भाजुन घेतात. त्याचे ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे किवटी. प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणारा हा लघुपट सर्वांनी नक्की पहावा.
- निलेश तुळशीराम भोपे, लेखक किवटी