मैत्री दिनानिमित्त : बांधुया मैत्रीच्या नात्याला ; विश्वासाच्या परंपरेला

लेखक – शशिकांत भगवान तोकडे, घोटी

काय बोलावं या मैत्रीबद्दल ? कधी आयुष्यात हरलो तर जिंकायला शिकवते तर कधी जिंकलो तर त्यात हरणाऱ्याचे दुःख वाटून घ्यायला शिकवते. तर पुन्हा नव्याने जगायला शिकवते ती ही मैत्री…!  खूप व्याख्या आहेत या मैत्रीच्या पण माझ्या मते मैत्रीची ओळख म्हणजे ”विश्वास”. मैत्रीचं दुसरं नाव म्हणजे विश्वास.

मित्राच्या गाडीवर मागे बसल्यावर त्याने कितीही जोरात गाडी चालवली तरी कधीच असं वाटत नाही की आपण पडू, आपल्याला लागेल, कारण जिवाच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला असतो. आयुष्यात कोणत्याच परीक्षेचं टेन्शन आलं नाही. कारण मित्र सोबत आहेत. स्वतः अभ्यास करत नव्हते पण मला मात्र नेहमी सांगतात तु पुढे जा, तु शिकलास म्हणजे आम्हीच शिकल्यासारख आहे. शाळेत असतांना खोड्या करून नाव माझं सांगायचे पण शिक्षा करायच्या वेळेस सर्व सोबत असायचे. संकटाच्या वेळी नातेवाईक कमी आणि हेच मित्र जास्त कमी यायचे. एकमेकांत कधीच गरीब, श्रीमंत, धर्म असा भेदभाव केला नाही यांनी. मित्र आपला आहे म्हणून काय झालं त्याच कुटुंब हे आपलंच कुटुंब आहे असं समजतात. प्रत्येकाच्या आईला आपली आई समजूनच आई अशीच हाक मारतात.

नाती खूप असतात जगात पण ज्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन रडावं वाटतं ना ते असतात मित्र. चुकल्यावर हक्काने ज्याच्या कानाखाली वाजवता येते ना ते असतात मित्र. कुठे जायचंय का जायचंय असं काही न विचारता फक्त सोबत चल म्हटल्यावर एका पायावर तयार असतात हे मित्र. प्रचंड विश्वास ठेवून ज्याच्याकडे आपण काही गोष्टी सांगतो ना तो असतो मित्र. आई, बाबा,  ताई, भाऊ अशी खूप नाती असतात. आपल्या आयुष्यात पण मैत्रीला कोणत्या नात्याचं नाव देणार तर ते म्हणजे ” विश्वासाचं नातं “. हे विश्वासाचं नातं आजच्या मैत्री दिनाच्या निमित्ताने घट्ट बांधुया…
            

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!