व्यवसाय मार्गदर्शन भाग – ६ : ज्वेलरी डिझायनिंग, ज्वेलरी शॉप

मार्गदर्शक : मधुकर घायदार
संपादक शिक्षक ध्येय, नाशिक
संपर्क : 9623237135

कोणत्याही समारंभात जाण्यासाठी फॅशनेबल कपड्यांबरोबरच विविध प्रकारचे दागिने, ज्वेलरी यांना विशेष महत्त्व असते. विविध प्रकारच्या दागिने तयार करण्याच्या पद्धतीला ‘ज्वेलरी डिझायनिंग’ असे म्हणतात. सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम इत्यादी  धातूंपासून विविध प्रकारचे दागिने तयार केले जातात.
ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वप्रथम या क्षेत्राची आवड, क्रिएटिव्हीटी, कल्पनाशक्ती, विविध आधुनिक फॅशन संदर्भातील माहिती, इमानदारी, प्रामाणिकपणा, सर्जनशीलता आदी गुणांची आवश्यकता असते.

ज्वेलरी डिझायनिंग या क्षेत्रात करिअर करण्यासाठी युवकांना बारावी नंतर विविध शॉर्ट टर्म कोर्स, सर्टिफिकेट कोर्स, पदविका तसेच पदवी अभ्यासक्रम आज उपलब्ध आहे. सर्टिफिकेट कोर्समध्ये प्रामुख्याने बेसिक ज्वेलरी डिझाईन, डायमंड आयडेंटिफिकेशन आणि ग्रेडिंग, कॅड फॉर जेम्स आणि ज्वेलरी, आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदविका ( डिप्लोमा ) अभ्यासक्रमात डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाईन आणि जॅमोलॉजी, एडव्हान्स ज्वेलरी डिझाईन, ज्वेलरी मॅन्युफॅक्चरींग आदी अभ्यासक्रम तसेच तसेच पदवी ( डिग्री ) अभ्यासक्रमात बी. एस्सी इन ज्वेलरी डिझाईन, बॅचलर ऑफ ज्वेलरी डिझाईन, बॅचलर ऑफ एक्सेसरीज डिझाईन, मास्टर डिप्लोमा इन ज्वेलरी डिझाईन आणि टेक्नोलॉजी आदी उपलब्ध आहेत.

ज्वेलरी डिझायनिंग या अभ्यासक्रमात वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक दागिने तयार करणे, स्टोन कटिंग, इलेक्टोप्लेटिंग, मेटल कलरिंग, एनॅमेलिंग, ज्वेलरी कॉस्टिंग, ज्वेलरी मेकिंग, प्रेझेंटेशनाची पद्धती, फ्रेमिंग आदी विविध प्रकारची ज्वेलरी डिझाईन बाबतीत शिकविले जाते. याशिवाय आधुनिक पद्धतीने ज्वेलरी सॉफ्टवेअरच्या मदतीने ज्वेल कॅड, ॲटो कॅड, थ्री डी स्टुडीओच्या सहाय्याने डिझायनिंग शिकविले जाते.
ज्वेलरी डिझायनिंगचे विविध अभ्यासक्रम मुंबई येथील एसएनडीटी युनिव्हर्सिटी, सेंट झेवियर्स कॉलेज, जमोलॉजी इंस्टीटयूट ऑफ इंडिया येथे, जयपूर येथील जेम्स आणि ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काउंसिल, जेम्स स्टोन आर्टिसन्स ट्रेनिंग स्कूल येथे, दिल्ली येथील इंडियन जेमोलॉजी इंस्टीटयूट, नेशनल इंस्टीटयूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी, अहमदाबाद येथील नेशनल इंस्टीटयूट ऑफ डिझाईन, नोएडा येथील ज्वेलरी डिझाईन आणि टेक्नोलॉजी इंस्टीटयूट येथे शिकविले जातात.

सध्या युवकांना ज्वेलरी डिझायनिंग हा अभ्यासक्रम केल्यानंतर बाजारात प्रचंड मागणी आहे. विविध ज्वेलरी कंपनीत, दागिन्यांच्या पेढ्या/दुकाने/शोरूम यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहे. युवकांना विविध ज्वेलरी कंपनीत दहा ते वीस हजार प्रतिमाह वेतन दिले जाते. एक ते दोन वर्षाचा अनुभव आल्यानंतर पंचवीस ते पन्नास हजारापर्यंत वेतन दिले जाते. भारतातील प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रात काही कंपन्या आज एक लाख रुपये प्रती महिना वेतन देत आहे.
ज्वेलरी डिझायनिंग क्षेत्रातील नक्षत्र, तनिष्क, गिली आदी नावाजलेल्या कंपन्या आहेत.

ज्वेलरी डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या व्यवसायाची माहिती झाल्यानंतर युवक स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकतो. सोन्याचे भाव दररोज कमी जास्त होत असतात. ज्वेलरीचे दुकान सुरु करून त्यात सोन्याच्या दागिन्यांची दुरुस्ती, डाग देणे, पॉलिश करणे आदी विविध प्रकारची कामे करता येतात. युवक भाडेतत्वावर दुकान घेऊन दोन ते पाच लाख भांडवलात ज्वेलरीचा व्यवसाय सुरु करू शकतो. या व्यवसायात वीस ते चाळीस हजार रुपये प्रतिमाह कमाई होते. जास्त भांडवल जास्त नफा या तत्त्वावर आधारित हा व्यवसाय असल्याने आजही गल्लोगल्ली ‘ज्वेलर्स’ चे दुकान व लोकांचा त्यांच्यावरील विश्वास आपण पाहतो. सोने खरेदीला आजही तितकेच महत्त्व आहे. आजकाल स्त्री तसेच पुरुष आपल्या सौदर्याप्रती जागरूक झालेले आहेत. दागिन्यांची आवड आहे अन डिझायनिंगविषयी विविध कल्पना आहेत, असे असतांना युवकांनी ‘ज्वेलरी शॉप’ या व्यवसायाचा विचार करायला हवा मात्र यालाही गरज आहे काही अंगभूत कौशल्य आणि प्रामाणिक सेवा देण्याची. तर युवकांनो, ज्वेलरी डिझायनिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी उत्तम करिअर आहे.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!