इगतपुरी पोलिसांची कामगिरी : दोघा सराईत दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद ; ४ लाख ८० हजारांच्या ६ दुचाक्या जप्त

इगतपुरीनामा न्यूज, दि. ३१

इगतपुरी पोलीसांनी सापळा रचुन २ सराईत दुचाकी चोरट्यांनी मोठया शिताफीने अटक केली आहे. त्यांच्या कडुन सुमारे ४ लाख ८०  हजार रूपये किमतीच्या ६ मोटार सायकली ताब्यात घेतल्या आहेत. महेश भालचंद्र खापरे वय २७, मयुर गणपत विसे वय १९ दोघे रा. आसनगांव ता. शहापुर जि. ठाणे असे दुचाक्या चोरणाऱ्या संशयितांची नावे असुन तिसरा संशयित फरार झाला आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर घाटनदेवी हद्दीत रात्री २ वाजेच्या सुमारात पोलीस पथकाची पेट्रोलींग सुरू होती. यावेळी ३ संशयित युवक पळण्याच्या तयारीत होते. पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता एका चोराने पळ काढला. दोघांना पोलीसी खाक्या दाखविताच चोरट्यांनी मोटर सायकल चोरी बाबत कबुली दिली. यावरुन पोलीसांनी कसुन चौकशी करीत दोघां चोरट्यांकडून वाशिंद, बदलापुर, मुरबाड, इगतपुरी अशा ठिकाणी जावुन ६ दुचाकी हस्तगत केल्या. यात वाशिंद येथुन २ दुचाक्या, १ होंडा शाईन, स्प्लेंडर, बदलापुर येथुन होंडा शाईन, मुरबाड येरहून होंडा शाईन, इगतपुरीतुन होंडा शाईन, केटीएम अशा ६ मोटार सायकली चोरट्यांकडून हस्तगत केल्या. या गाडयांची अंदाजे रक्कम ४ लाख ८० हजार इतकी आहे.

या सराईत चोरांच्या साथीदारांमध्ये आणखी काही चोर व घरफोडी करणारे असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला आहे. आज दोघा चोरट्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक दिपक पाटील, पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र दिवटे, पोलीस कर्मचारी आर. कोळी, संतोष गांगुर्डे, सचिन देसले, ईश्वर गंगावणे, सचिन बेंडकुळे, मुकेश महिरे, राजेंद्र चौधरी, संदीप शिंदे आदी करीत आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!