
इगतपुरीनामा न्यूज – पुण्यात्मा प्रभाकर सेवा मंडळ, अनुसयात्मजा मतिमंद निवासी विद्यालय, इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय आणि रुख्माबाई अपंग युवक स्वयं सहाय्यता केंद्र इगतपुरी यांच्या वतीने पुज्य रुख्मा जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली. कार्यक्रमात कर्णबधिर, गतिमंद तसेच अंध दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कलागुणांचे प्रभावी दर्शन घडवून उपस्थितांची मने जिंकली. शारीरिक अडचणींवर मात करत या विद्यार्थ्यांनी हिंदी मराठी गीते सादर केलीच, पण त्या गाण्यांना स्वतः संगीतही दिले. संगीताची लय, सूर आणि भाव यांचा सुरेख संगम अनुभवतांना प्रेक्षक थक्क झाले. समाज प्रबोधन करणाऱ्या विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य विशेष लक्षवेधी ठरले. सामाजिक जाणीव, एकोप्याचा संदेश, स्वच्छता, शिक्षणाचे महत्त्व आदी विषयांवर आधारित सादरीकरणातून त्यांनी समाजाला सकारात्मक संदेश दिला. अभिनयातूनही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना प्रभावीपणे व्यक्त केल्या. त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वतः बनविलेल्या विविध हस्तकला वस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेबरोबरच स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला. उपस्थित नागरिकांनी या वस्तूंना भेट देत विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी नगराध्यक्ष शालिनी खातळे, नगरसेविका वंदना रोकडे, आशा थोरात, आशा भडांगे, चारुलता ठाकूर, केदार भट, विवेक हट्टंगडी, राजेंद्र शिंदे, कर्मचारी उपस्थित होते