इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
अंबोली फाटा ते वेळुंजे तुपादेवी तळवाडे फाटा ते रोहीले गिरणारे वाघेरा फाटा ते साप्ते फाटा या तालुक्यातील महत्वाच्या आणि सततची वाहतुक चालु असलेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. पडलेले मोठमोठे खड्डे हे अतिशय जीवघेणे आहेत. वाहन चालकांना वाहन चालवणे अतिशय खडतर झाले आहे. यामुळे खुप मोठा त्रास होत असून अनेक वाहनांचे नुकसान होत आहे. दुसरीकडे खड्डे चुकवतांना वाहनांचे अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. ह्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका युवासेनेचे उपतालुकाप्रमुख नितीन तिदमे आक्रमक झाले आहेत. त्र्यंबकेश्वरच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ च्या अधिकाऱ्यांना नितीन तिदमे यांच्या नेतृत्वाखाली आज निवेदन देण्यात आले. तातडीने रस्त्यांवर उपाययोजना न केल्यास खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून शिवसेनेच्या स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
मागील वर्षी जिवघेण्या खड्ड्यांनी बोंबीलटेक अंबोली येथे २ जणांना हकनाक आपला जिव गमवावा लागला आहे. या रस्त्यांची खड्यांमुळे चाळण होऊन बेसुमार खड्डे पडले आहेत. यासह रस्त्यावर पथदीप नसल्याने खड्डयात आदळून दुचाकीस्वार गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत. कित्येक वाहनांचे वारेमाप नुकसानही झालेले आहे. हे खड्डे बुजले गेले नाही तर अनेक बळी जाऊ शकतात. खड्डे बुजवून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अन्यथा शिवसेना स्ट्राईलने खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. युवासेनेचे त्र्यंबकेश्वर उपतालुकाप्रमुख नितीन तिदमे यांच्या नेतृत्वाखाली योगेश सदगीर, विजय धनगर, करण साबळे, गोविंद शिरसाठ, गोकुळ तिदमे, दिपक रायकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.