लाजिरवाणे – ६ ते ७ किमी दऱ्याखोऱ्या, २ ओहळांची डोलीतुन पायपीट करूनही रस्ताच नसल्याने वृद्धाचा मृत्यू : इगतपुरी तालुक्यातील दुर्दैवी घटनेने संताप 

भास्कर सोनवणे : इगतपुरीनामा न्यूज – कोट्यवधी रुपयांची विकासाची कामे केल्याचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून पाहावे अशी घटना घडली आहे. इगतपुरीच्या अतिदुर्गम आदिवासी भागातील खैरेवाडी येथील बबन रावजी शेंडे या ६५ वर्षीय वृद्धाचा रस्ताअभावी मृत्यू ओढवला आहे. शुक्रवारी त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने घरच्या व परिसरातील ग्रामस्थांनी डोलीतुन त्यांना उपचारासाठी नेले जात असतांना त्यांचा मृत्यू झाला. ६ ते ७ किमी दऱ्याखोऱ्या आणि २ ओहळांची पायपीट करून मुख्य रस्त्यावर आणताच त्यांना मृत्यूने गाठले. विकासाचा बागुलबुवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी रस्त्याचे काम केले असते तर जीव वाचला असता अशी चर्चा सुरु आहे. अनेक वर्षाच्या विकासाचा दावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींसाठी ही अत्यंत लाजिरवाणी घटना समजली जात आहे. यासह इगतपुरीचे विद्यमान तहसीलदार यांनीही रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तत्कालीन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी पुढाकार घेत रस्त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची बदली झाल्याने हा प्रस्ताव रखडला. विद्यमान तहसीलदारांनी याकडे अजिबात गांभीर्याने पाहिले नाही असे ग्रामस्थ सांगतात. गेल्या अनेक वर्षापासून या भागात रस्ता नसल्याने पावसाळ्यातही विद्यार्थ्यांना येथून शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो. आजारी व्यक्ती, वृद्ध ग्रामस्थ आणि गर्भवती महिलांची हाल तर विचारूच नका. इगतपुरीच्या शासकीय कार्यालयांत रस्त्यासाठी स्थानिक ग्रामस्थ चकरा मारतात मात्र त्यांना आश्वासनाशिवाय काहीही भेटत नाही. आदिवासी बहुल मतदार संघ व आदिवासी आमदार असतांना अजूनही आदिवासी बांधव मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे अधोरेखित झाले आहे.

error: Content is protected !!