शब्दांकन : निलेश काळे, पिंपळगाव मोर
संवाद : ९८८१८५१७०४
मुंबई- आग्रा महामार्गावर घोटीजवळ माणिकखांब मनमोहक असे विठ्ठल रुख्मिणी मंदिर आकर्षित करून घेते. दारणाकाठी निसर्गाच्या कुशीत असलेले मंदिर परिसरातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान बनले आहे. आषाढी कार्तिकीला जणू पंढरपूरचा छोटेखानी थाट इथे अनुभवायला मिळतो. एकदा तरी येथे भेट दिल्याशिवाय तृप्ती लाभत नाही.
माणिकखांब येथील चव्हाण परिवाराने आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ मंदिर बांधले असून पूर्वजांचा संप्रदायाचा वारसा पुढे चालवला आहे. परिवारातील सदस्यांच्या दशक्रियेवेळी मंदिर स्थापनेचा संकल्प जनतेसमोर बोलून दाखवून मंदिराची स्थापना केली. २०१४ मध्ये विजयादशमीला भूमिपूजन करून २०१६ मध्ये विठ्ठल रुख्मिणीची मूर्ती स्थापना केली.
आषाढी एकादशीला ज्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होते, त्याच धर्तीवर माणिकखांबच्या मंदिरात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा होते. कार्तिकी एकादशीला विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते सपत्नीक पूजा होत असते. आषाढी वारीच्या दिवशी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना फराळ वाटप केले जाते. भैरवनाथ भजनी मंडळातर्फे भजन पूजन आयोजन करून प्रसाद वाटप केला जातो.
पंढरपूरचे विठ्ठल – रुख्मिणी मंदिराच्या सभोताली ज्याप्रमाणे चंद्रभागेचा चंद्रकोर आहे, अगदी तसाच चंद्रकोर माणिकखांब येथील मंदिराला निसर्गतः लाभला आहे. पंढरपूरच्या धर्तीवर चंद्रभागेतील पुंडलिकाचे मंदिर आहे अगदी तसेच दारणा नदीत असावे असा चव्हाण परिवाराचा मानस आहे. आगामी काळात नक्कीच त्याप्रमाणे पांडुरंग परमात्मा केल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या महामारीपासून सर्वांचे जीवन पुन्हा एकदा सुरळीत होण्यासाठी माणिकखांब येथील मंदिरात जाऊन प्रार्थना करूया. नक्कीच ही प्रार्थना पंढरी नगरीच्या राजाकडे जाऊन पोहोचल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्णहरी