इगतपुरीनामा न्यूज – खैरगाव जवळ शिदवाडी शेजारील मोराच्या डोंगरावर जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात गावठी दारू बनवत असल्याची गुप्त माहिती घोटीचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांना मिळाली. ही माहिती समजताच नाशिक ग्रामीण पोलीस अधिक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह या जंगलात दोन ठिकाणी छापा टाकला. वन विभागाच्या हद्दीतील डोंगर कपारीतुन धुर येत असल्याचे पाहुन पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले असता पोलिसांची चाहुल लागताच दारु बनवणाऱ्या इसमांनी जंगलात धुम ठोकली. पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकुन गावठी दारूसाठी लागणारे १ लाख ४८ हजार रुपये किमतीचे रसायन जागेवरच नष्ट केले.
खैरगाव येथील मोराच्या डोंगरात मोठ्या प्रमाणावर गावठी दारू बनवली जाते. वन विभागाच्या हद्दीत मोठे जंगल असुन पोलिसांची चाहुल लागताच दारू बनवणारे इसम थेट जंगलात पळून जातात. दारू बनवणाऱ्या अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत असुन या कारवाईत पहिल्या छाप्यात गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे ५३ हजार ६०० रूपयाचे एक हजार लिटर रसायन मुद्देमाल जागेवरच नष्ट केला. तर याच परिसरात दुसऱ्या ठिकाणी छापा मारत ९५ हजार रुपये किंमतीचे रसायन, उग्र वासाचा गुळ, नवसागर, मुद्देमाल जागेवरच नष्ट करत मोठी कारवाई केली. या धडक कारवाईत जवळपास १ लाख ४८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस हवालदार सागर सौदागर, संतोष नागरे, सोमनाथ बोराडे, केशव बस्ते, सतिष चव्हाण, होमगार्ड अमोल मोंडे आदींनी सहभाग घेतला असुन अज्ञात आरोपींविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.