कोणी हस्तक्षेप करीत असेल अजिबात गय करणार नाही : आमदार हिरामण खोसकर
इगतपुरीनामा न्यूज, दि. २०
इगतपुरी तालुक्यातील अंगणवाडी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शक आणि निष्पक्ष होणार आहे. २३ जुलै पर्यंत पात्र महिलांनी अर्ज करण्याची मुदत असून कोणत्याही प्रकारे गैरव्यवहार करण्याला ह्यामध्ये थारा दिला जाणार नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी अथवा कोणीही मध्यस्थ यामध्ये हस्तक्षेप करीत असेल किंवा आर्थिक मागणी करीत असेल तर तात्काळ याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी. ह्या भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे गैरप्रकार होणार नाहीत. मात्र दक्षता घेऊन पात्र महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी लक्ष घातले आहे. इगतपुरीचे बाल विकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांना दूरध्वनी करून नियमांमध्ये भरती प्रक्रिया राबवा असे निर्देश दिले. कोणाचाही हस्तक्षेप होत असेल तर निदर्शनास आणून द्यावे. विधवा, निराधार, परित्यक्ता आदी प्रवर्गाच्या पात्र महिलांसाठी मी कटाक्षाने लक्ष घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंडित वाकडे यांनी शासकीय नियम आणि मार्गदर्शक तत्वप्रणालीप्रमाणे भरतीचे कामकाज राबवत असल्याची यावेळी ग्वाही दिली.
इगतपुरी तालुक्यातील विविध अंगणवाड्यांमध्ये अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. २३ जुलैला अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे. ह्या भरती प्रक्रियेत वशिलेबाजी, आर्थिक देवाणघेवाण, राजकीय हस्तक्षेप होत असल्याबाबत चर्चा ऐकण्यात येत आहेत. यामुळे गरजू आणि पात्र महिलांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांनी विशेष लक्ष घातले आहे. कोणत्याही परीस्थितीत कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी त्यांनी सूचना केल्या आहेत. इगतपुरीचे बालविकास प्रकल्पाधिकारी पंडित वाकडे यांना दूरध्वनी करून त्यांनी भरती प्रक्रियेची सर्वांगीण माहिती घेतली. नियमाप्रमाणे भरती प्रक्रियेचे कामकाज करून कोणावरही अन्याय होऊ देऊ नये यासाठी त्यांनी विविध सूचना केल्या. कोणीही यामध्ये हस्तक्षेप करीत असेल तर मला व्यक्तिशः कळवावे असेही आमदार खोसकर यांनी श्री. वाकडे यांना बजावले.
शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे संपूर्ण भरती प्रक्रिया राबवली जाईल. कोणी कितीही मोठा असू द्या, नियम सर्वांना सारखे राहतील. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही. कुठलीही अडचण, समस्या आली तर माझ्याशी थेट बोलावे अशा कडक सूचना हिरामण खोसकर यांनी बालविकास प्रकल्पाधिकाऱ्यांना दिल्या. सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात येईल असा शब्द अधिकाऱ्यांनी दिला.
अंगणवाडी भरती प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक आणि पारदर्शक होणार आहे. यामध्ये कोणाचीही वशिलेबाजी चालणार नाही. कोणीही कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता नियमाप्रमाणे कागदपत्राची पूर्तता करावी. भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार होणार नाही. असे कोणाला आढळून आले तर मला माहिती द्यावी. पात्र महिला उमेदवारांच्या पाठीशी राहण्याचा मी शब्द देत असून भरती प्रक्रियेवर माझे सूक्ष्मपणे लक्ष आहे.
- हिरामण खोसकर, आमदार इगतपुरी त्र्यंबकेश्वर