कशी कराल स्पर्धा परीक्षेची नियोजनपूर्वक तयारी ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे. परंतु महाविद्यालयीन परीक्षा, स्पर्धा परीक्षा आदींचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. योग्य नियोजन हाच तर परीक्षेचा आत्मा आहे. नियोजन नसेल तर कितीही प्रयत्न करा यश मिळणार नाही. अपयशाने विद्यार्थी नैराश्यग्रस्त होतात. म्हणून या अनुषंगाने आपल्याला नियोजन कसे करता येईल हे आपण जाणून घेऊया.

उद्दीष्ठ ठरवा
सर्वप्रथम आपले उद्दिष्ट निश्चित करा. आपल्याला कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या पदासाठी तयारी करायची आहे ते निश्चित केले तर अभ्यासाचे नियोजन आणि आखणी व्यवस्थित करता येईल. उगाचच आपले मित्र मैत्रिणी करत आहे म्हणुन मी पण करत आहे असे विचार न करता स्वतचं उद्दीष्ट ठरवा.

वाचनाची आवड
रोज ठराविक वेळ वाचनाची सवय लावून घ्या. परीक्षा जवळ आली म्हणून अभ्यास न करता रोजच वाचन केले पाहिजे. स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम अत्यंत सखोल आणि विस्तृत असतो. तो काही दिवसात पूर्ण होणार नसून त्यासाठी रोजच अभ्यासाची सवय लावून घेणे गरजेचे आहे.

विषय समजून घ्या
बरेच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विषय समजून न घेता एकदम सखोल वाचनाला सुरुवात करतात. याचा परिणाम असा होतो की एकतर विषय डोक्यात घुसत नाही आणि खूप कंटाळवाणे वाटते. त्याऐवजी त्या विषयाची माहिती समजून घेताना त्याबद्दल एकदम खोल वाचन न करता न संबंधित विषयाची सामान्य माहितीचे वाचन करा. यामुळे विषयाबद्दल आवड निर्माण होईल. समजण्यास सुद्धा सोपे जाईल. उदा. राष्ट्रीय स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यावयाचा असेल तर स्थानिक पातळीवर स्पर्धेत भाग घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे एखाद्या विषयाची माहिती नसेल तर एकदम सखोल न वाचता सुरूवात सामान्य माहिती पासून करायला हवी.

समूह चर्चा
एमपीएससी, यूपीएससी करणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करताना समूह तयार करतात आणि त्यावर अभ्यास विषयाबद्दल चर्चा करतात. याचा फायदा होत असला तरी बऱ्याचदा अस्वस्थ सुद्धा वाटते. इतरांच्या तुलनेत आपली अजून काही तयारी नाही. यामुळे बरेच विद्यार्थी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त होतात. तुम्हाला असे वाटत असेल तर सामूहिक चर्चा टाळा किंवा ग्रूप सोडा. मुळात तुम्ही काय वाचन केले. कोणता विषय हाताळला हे इतरांना सांगण्याची आवश्यकता नाही. तुमचा वेळ ही यामुळे वाचेल.

मेंदूला विश्रांती द्या
ठराविक काळ काम केल्यानंतर आपल्या शरीराला आरामाची गरज असते. त्याप्रमाणे ठराविक वेळ वाचन केले की आपल्या मेंदूला विश्रांतीची गरज असते. कारण अभ्यास करणे हे देखिल बौद्धिक कार्य आहे. म्हणुन अभ्यास करताना काही अंतराने मेंदूला विश्रांती द्या. मात्र बरेच विद्यार्थी विरंगुळा म्हणून टीव्ही, मुव्ही, यू ट्यूब व्हिडिओ पाहतात. असे केल्याने अजूनच मेंदू वर ताण येऊन विस्मरण देखील होते. त्याऐवजी चिंतन, मनन करा, झोप घ्या, फेरफटका मारून या. यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल आणि वाचलेले लक्षातही राहील.

नोट्स काढा
प्रत्येक वेळी वाचन करताना अवघड संकल्पना, महत्त्वाच्या घडामोडी यांच्या नोट्स लिहून काढत चला. कारण केवळ वाचन करण्यापेक्षा ते लिहून काढले तर अधिक लक्षात तर राहील. याशिवाय परीक्षेच्या अगोदर त्याचा तुम्हाला उपयोग होईल.

उजळणी आणि सराव
अध्ययनाचा तिसरा नियम उजळणी आणि सराव होय. कोणतीही गोष्ट शिकत असताना त्याचा सराव आणि उजळणी होणे गरजेचे असते. तरच ती गोष्ट लक्षात राहते. सर्व विषय वाचल्यानंतर त्याची पुन्हा पुन्हा उजळणी करा. गणित विषय असेल तर रोज सराव करणे आवश्यक आहे. परीक्षेआधी सर्व विषयांची किमान तीन चार वेळा उजळणी होणे गरजेचे आहे.

धरसोड वृत्ती टाळा
बरेच विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करताना अनेक प्रकाशनांची भरमसाठ पुस्तके आणून ठेवतात. आपल्या मित्राने जे आणले ते घेऊन येतात. एक ना धड अशी गत होऊन जाते. कोणते पुस्तक वाचावे याबाबत गोंधळ होतो. त्यासाठी अभ्यासाला सुरुवात करण्याआधीच सर्व संदर्भ पुस्तकांची यादी तयार करा. त्यानुसार पुस्तके आणून वाचू शकता. वास्तविक जवळपास सर्वच पुस्तकांमध्ये सारखीच माहिती असते. त्यामूळे गोंधळ न करता जी पुस्तके घेतली आहेत ती पुस्तके मन लावून वाचा. आधीचे सर्व पुस्तकांचे वाचन आणि आकलन झाल्याशिवाय नवीन पुस्तके घेऊ नका. पुस्तकाचा नुसता ढिगारा न करता जी आवश्यक आहे तीच पुस्तके आणावीत.

क्लासेस
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी क्लासेस लावले असतील तर उत्तमच आहे. मात्र यातही धरसोड वृत्ती दिसून येते. आपल्या मित्राने हे क्लास लावले म्हणुन मी पण तेच लावणार. असे न करता अगोदरच क्लासेस विषयीची माहिती काढा. शेवटी लक्षात घ्या क्लासेस कोणतेही असो किंवा प्रकाशन कोणतेही असो, अभ्यास तुम्हला करायचा आहे. कितीही महागडे क्लासेस लावले तरीही जोवर तुम्ही स्वतः मेहनत करणार नाही तोपर्यंत फळ मिळणार नाही.

अवांतर वाचन
अवांतर वाचनाची गोडी निर्माण करा. कारण स्पर्धा परीक्षा म्हटले की चालू घडमोडींवर प्रश्न हे हमखास असतात. त्यामुळे रोज न्यूज पेपर, साप्ताहिक मासिक वाचा. ज्यातून तुम्हाला चालू घडामोडींबद्दल माहिती मिळेल.

नकारात्मकता टाळा
शक्यतो अशा गोष्टींपासून दूर राहा ज्याने तुम्हाला अस्वस्थ वाटेल. इतकेच काय मित्र मैत्रिणी सोबत गप्पा मारत असतानाही नकारात्मक विषयाबद्दल बोलणे कटाक्षाने टाळले पाहिजे. कारण अशा गोष्टी मनात नकारात्मक विचार निर्माण करतात. यामुळे स्वतःबद्दल आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो.

अभिरुची
स्वतःची अभिरुची जाणून घ्या आणि त्यानुसार परीक्षा कोणती द्यायची ते ठरवा. उगाच भरमसाठ परीक्षा फार्म भरून स्वतः साठी गोंधळ करु नका. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी करताना बराच कालावधी लागतो त्यामूळे एक विशिष्ट आवड असेल त्या पदासाठीच सखोल अभ्यास करता येईल.

सकारात्मक विचार
पहिल्या दुसऱ्या प्रयत्नात यश मिळेल असे नाही. त्यामुळे निराश न होता कोणत्या चुका झाल्या आणि अजून काय करायला हवे याचा आढावा घ्या. यामुळे पुढील परीक्षेत आधी केलेल्या चुका टाळता येईल.

योगा आणि ध्यान
शास्त्रीय दृष्टिकोनातून योग आणि ज्ञानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा तुमचा शारीरिक-मानसिक तणाव कमी करतो. ध्यानाने तुमची स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे ठराविक वाचन केल्यानंतर किमान दहा मिनिटे ध्यान करू शकतात. यामुळे वाचलेले तुमच्या स्मृतीपटलावर आपोआपच येईल.

मानसिक तयारी
अध्ययनाच्या पहिल्या नियमानुसार कोणतीही गोष्ट आत्मसात करण्यापूर्वी शारिरीक आणि मानसिक तयारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यानुसार आधी पासूनच तयारी करता येईल. महाविद्यालयीन पदवी घेत असताना त्यानुसार विषय निवडता येतील. म्हणजे पुढे स्पर्धा परीक्षा जास्त कठीण वाटणार नाही. आधीच निश्चित करा की आपल्याला काय करायचे आहे त्यानुसार तुम्ही शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेताना तयारीला सुरूवात करु शकता.

विद्यार्थी मित्रांनो करीअर तर करायचे आहेच. त्यासाठी आपण मेहनतही घेत आहात. पण झालेच पाहिजे असा विचार न करता प्रामाणिक प्रयत्न करा. यश हे एका दिवसात मिळणारी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मोठी साधना करावी लागते. यशाला शॉर्टकट नाही. त्यामूळे संयम राखून अभ्यास करा. जे कराल ते मन लावुन करा. अपयश आले तरी मन शांत ठेवा आणि पुन्हा प्रयत्न करा. मागचा विचार न करता पुढे पुढे चला. यश तुमची वाट बघत आहे हे निश्चित ध्यानात ठेवा.

वरील व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://youtu.be/elz01sKh7tA

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!