इगतपुरीनामा न्यूज, दि. 26
महिला बचत गटांनी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले असून त्या महिला उद्योग व्यवसायात उभ्या आहेत. या यशस्वी बचतगटांतील महिलांच्या यशकथा उत्तमरित्या लिहिल्या जाव्यात आणि त्याचे संकलन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ‘कथा यशस्वीनींच्या’ ही राज्यस्तरीय यशकथा लिखाण स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
या स्पर्धेकरिता, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून गावाच्या स्थितीत बदल, महिला बचत गटाकडून नाविन्यपूर्ण व्यवसायाची उभारणी, महिला बचत गटाच्या सामुहिक प्रयत्नातून सदस्यांचे समस्या निराकरण, स्वयंसहायता महिला बचत गटाचे यशस्वी आणि शाश्वत व्यवसाय, महिला बचत गटामार्फत अन्नप्रक्रिया उद्योग, महिला बचत गटामार्फत शेतीपूरक उद्योग व्यवसाय, महिला बचत गटांची डिजिटल साक्षरता आणि त्याचा गटाच्या विकासासाठी उपयोग, महिला बचत गटांचा यशस्वी मत्स्यव्यवसाय, महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी ( मदत कार्य ), महिला बचत गटाची कोविड 19 प्रादुर्भाव काळातील अद्वितीय कामगिरी ( व्यवसाय/उद्योग ), महिला बचत गटाच्या मदतीने गट सदस्य महिलांचे वैयक्तिक यशस्वी व्यवसाय/ उद्योग, DDUGKY अंतर्गत प्रशिक्षण घेऊन यशस्वीरीत्या रोजगारप्राप्ती आणि RSETI मधून प्रशिक्षित होऊन यशस्वी उद्योग व्यवसाय हे लिखाणाचे विषय आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदचे कर्मचारी किंवा महिला बचत गटाचे सदस्य असणे आवश्यक असून यशकथा मराठी भाषेत आणि युनिकोडमध्ये लिहिलेली असावी तसेच कमाल 750 शब्दमर्यादा असावी. ही स्पर्धा जिल्हा आणि तालुका स्तरावरील कर्मचारी/व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती आणि गावस्तरावरील महिला बचत गटाचे सदस्य या तीन गटात होणार आहे. ही स्पर्धा दि. 10 नोव्हेंबर पर्यंत आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना राज्यस्तरावर प्रथम पारितोषिक म्हणून रूपये 21 हजार आणि सन्मानपत्र, राज्यस्तरावर द्वितीय पारितोषिक रूपये 15 हजार आणि सन्मानचिन्ह, राज्यस्तरावर तृतीय पारितोषिक रूपये 11 हजार आणि सन्मानचिन्ह तसेच रूपये 2100 चे प्रत्येकी दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात येतील. या स्पर्धेच्या संपूर्ण अटी व नियमावलीसाठी या अभियानाच्या राज्य कक्षात आणि जिल्हा कक्षात संपर्क करून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले आहे.