लग्न सोहळ्यांत गर्दी होत असेल तर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी

लग्न सोहळ्यांमधील गर्दी टाळण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०

नागरिकांनी लग्न सोहळे तसेच इतर घरगुती सोहळे करताना गर्दी करू नये. यासारख्या सोहळ्यांमुळे रुग्ण अधिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे अधिक काळजी घेण्याची गरज असून पोलीस प्रशासनाने याकडे विशेष लक्ष द्यावे, जास्त गर्दी होत असेल तर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक स्वामी रिसॉर्ट, लासलगाव येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या सर्व उपाययोजनांबाबत आराखडा तयार करण्यात यावा. लसीकरणाबाबत अधिक केंद्र वाढविण्याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच ऑक्सिजन जनरेशन प्लँटच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर तातडीने बसविण्यात यावेत. शासकीय रूग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील लसीकरणाच्या अनुषंगाने आवश्यक नवीन लसीकरण केंद्र स्थापन करून केंद्राची संख्या वाढवावी. लसींची उपलब्धता लक्षात घेऊन ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली आहे, त्यांना दुसरी लस देण्याची पूर्तता प्रामुख्याने करण्यात यावी. लग्न समारंभास परवानगी देताना शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन होणे अधिक गरजेचे असून या ठिकाणी सॅनिटायझर, मास्क व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन होते किंवा नाही हे पोलिस यंत्रणेने तपासणे गरजेचे आहे. तालुक्यात व शहरात गृहविलगीकरणात ठेवलेल्या रूग्णांची वेळोवेळी तपासणी करावी. ज्या गृहविलगीकरणात रूग्णांची व्यवस्था पुरेशी नसेल, अशा रूग्णांना तातडीने रूग्णालयात स्थलांतरीत करण्यात यावे. कोरोनासोबत आता म्युकरमायकोसिस, डेल्टा प्लस व लॅमडा या नवीन आजारांचे आगमन होत असताना, प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून स्वत:सोबत आपल्या कुटूंबियांची काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्हा व तालुक्यातील बाजार समिती यांनी सुध्दा बाजार समितीमध्ये नागरिकांना प्रवेश देतेवेळी योग्य दक्षता घ्यावी. तपासणी केल्याशिवाय बाजार समितीत प्रवेश निषिध्द करावा, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

यावेळी लासलगाव ग्रामपंचायतचे सरपंच तथा मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ थोरे, येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ.अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, निवासी वैद्यकीय अधिकारी श्री. खैरे, येवला ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, गटविकास अधिकारी संदीप कराड, डॉ. उन्मेष देशमुख, शाखा अभियंता गणेश चौधरी, उपशाखा अभियंता गोसावी, येवला तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेऊन पुढील पाऊल टाकावे

यावेळी पीक परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात पाऊस लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांनी आगामी पावसाचा अंदाज घेऊनच, आवश्यक पेरणी करावी. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येऊ नये यासाठी कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करावे. युरिया व खते यांचा मुबलक साठा उपलब्ध करून ठेवल्यास आगामी काळात त्याचा तुटवडा भासणार नाही, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळयांनी यावेळी केल्या आहेत.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!