
निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. ५
खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीनंतर लागवडीच्या कामे सुरू झाली आहेत. शेती म्हटलं की पेरणीपासून पीक काढणीपर्यंत खतांची गरज असते. इगतपुरी तालुक्यासह परिसरात लागवडीच्या कामांना सुरुवात झाली आहे. ऐन मोसमात दुकानांतून युरिया दिसेनासा झाल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षभर मुबलक साठा असतांना ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचा अपुरा साठा की कृत्रिम टंचाई ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रब्बी हंगामात सर्वच ठिकाणी भाजीपाला पिकत नसल्याने काही माळरान भागावर कडधान्ये घेतली जातात. कडधान्यांमुळे खतांची मागणी कमी असते. शिवाय ठिबक सिंचन प्रणालीमध्ये ‘लिक्विड खते’ वापरली जातात. याउलट खरीप हंगामात बऱ्याच प्रमाणावर भात शेती केली जाते, त्यामुळे बहुतांशी प्रमाणात खतांची टंचाई भासत असते.
खरीप हंगामात पिकांसाठी युरिया खताला मागणी असते. शासनाकडून खतांचे नियोजन करून साठा आरक्षित केला जातो. तरीही खतांची टंचाई कशी हा प्रश्न नेहमी प्रश्न पडला आहे.
बाजारात अनेक खत विक्री दुकानदार युरिया खत शिल्लक नसल्याचे सांगत आहेत. याशिवाय खते उपलब्ध झालेच तर युरियाबरोबर मिश्रखते ( दाणेदार ) घेण्याची सक्ती करतांना दिसत आहेत. शासनाकडून मेट्रिक टनमध्ये युरिया खत आरक्षित करून वाटप केल्याचे सांगितले जाते. शिवाय वारंवार खते मुबलक असल्याचेही म्हटले जात असतांना प्रत्यक्षात बाजारात टंचाई भासत आहे. कुठे खतांचा साठा करून काळाबाजार होतो आहे का हे पाहणे देखील गरजेचे असल्याचे शेतकरी सांगतात. प्रत्येक वर्षी उद्भवणारा युरिया आणि मिश्रखतांच्या टंचाईचा प्रश्न कधी सुटणार ? असे शेतकरी वर्गाकडून विचारले जात आहे.