आमदार निधीतून ५ टक्के दिव्यांग निधी खर्च करण्याची आमदार खोसकरांकडे मागणी

इगतपुरीनामा न्यूज, दि. २२
इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दिव्यांग बांधव कोरोना महामारीमुळे अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत आहेत. दिव्यांगांच्या कुटुंबाला सुद्धा यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. ह्या पार्श्वभूमीवर दिव्यांग बांधवांसाठी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून ५ टक्के दिव्यांग निधीची रक्कम दिव्यांगांच्या कल्याणासाठी द्यावी अशी मागणी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष सपन परदेशी यांनी केली आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांना भेटून याबाबत पदाधिकाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन दिले. आमदार खोसकर यांनी मागण्यांबाबत सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीत दिव्यांग बांधवांचे प्रचंड हाल होत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून दिव्यांग ५ % निधी गरजु दिव्यांग बांधवांच्या खात्यात वर्ग करावा. यामुळे दिव्यांग बांधवांचे जीवन उंचावण्यासाठी मोठा हातभार लागु शकतो. याप्रश्नी इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे एक आढावा बैठक घेऊन समाजातील दुर्बल घटक यांच्या समस्या सोडवण्याबाबत उपाय योजना कराव्यात.  दिव्यांग बांधव व निराधार यांच्या समस्या सोडवण्याबाबत प्राधान्य क्रम देऊन न्याय द्यावा असे निवेदनात शेवटी म्हटले आहे. आमदार हिरामण खोसकर यांना निवेदन देतेवेळी जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव, काँग्रेस नेते संदीप गुळवे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन गव्हाणे, तालुका उपाध्यक्ष सपन परदेशी, अनिल कोरडे, पढेर उपस्थित होते. 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!