इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान ; राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर इगतपुरी तालुक्याचा वरचष्मा

राज्यस्तरीय कार्यक्रम

तालुका कृषी अधिकारी तंवर यांच्या मार्गदर्शनाने मिळाले यश

इगतपुरीनामा न्यूज, दि. १

गहू पिकाच्या उत्पादनात आदिवासी गटातून इगतपुरी तालुक्यातील साकुर येथील शेतकरी विठ्ठल भीमा आवारी यांनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. आज कृषी दिनानिमित्त मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषीमंत्री ना. दादाजी भुसे, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी विठ्ठल आवारी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. इगतपुरी तालुक्यातील कर्तृत्ववान शेतकऱ्याचा सन्मान संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी भूषणावह असल्याची प्रतिक्रिया इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी दिली. साकुर गावाचे नाव राज्यभर झळकले असल्याने गावाला सार्थ अभिमान वाटतो असे कौतुक सरपंच विनोद आवारी, माजी सभापती आनंदराव सहाणे, माजी सरपंच तुकाराम सहाणे आदींनी व्यक्त केले.

विभागीय स्तरावरील कार्यक्रम

नाशिक विभागीय स्तरावरील गहू पीक स्पर्धेच्या विजेत्यांना नाशिकच्या त्र्यंबक विद्यामंदिर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत कृषी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. इगतपुरी तालुक्यातील घोडेवाडी येथील शेतकरी जगन्नाथ घोडे विभागीय स्तरावरील गहू पिक स्पर्धा विजेते ठरले आहेत. त्यांना पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांनी सन्मानित केले. नाशिक जिल्हास्तरीय गहू पीक स्पर्धेत इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव येथील शेतकरी रामदास गभाले विजयी झाले. त्यांचाही ह्या कार्यक्रमात मंत्री महोदयांनी सत्कार केला.

नाशिक जिल्हा स्तरावरील कार्यक्रम

राज्य स्तरावरील प्रथम क्रमांकाचे विजेते विठ्ठल आवारी यांना साकुरचे कृषी सहाय्यक किरण सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. नाशिक विभागीय स्तरावरील विजेते शेतकरी जगन्नाथ घोडे यांना कृषी सहाय्यक जयश्री गांगुर्डे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक जिल्हास्तरीय विजेते शेतकरी रामदास गभाले यांना कृषी सहाय्यक शांताराम गभाले यांनी मार्गदर्शन केले. कृषी सहाय्यक अशोक राऊत यांनी तालुका स्तरीय विजेत्यांना मार्गदर्शन केले.

इगतपुरी तालुकास्तरीय कार्यक्रम

कृषी दिनानिमित्त आडवण येथे इगतपुरी तालुकास्तरीय कार्यक्रम घेण्यात आला. घोटी खुर्द येथील शेतकरी शांताराम निवृत्ती कोकणे यांचा तालुका स्तरीय गटात प्रथम क्रमांक आला. इगतपुरी पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड, पंचायत समिती कृषी अधिकारी मोकळ, तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, विविद्य सरपंच आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या कुशल नियोजनानुसार कृषी पर्यवेक्षक संजय पाटील, किशोर भरते, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते यांनीही वेळोवेळी विजेत्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून विजयासाठी मौलिक मार्गदर्शन केले.

बक्षिसांचे स्वरूप असे आहे.
■ महाराष्ट्र राज्य स्तर – सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख 50000 रुपये
■ नाशिक विभागीय स्तर – सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख 15000 रुपये
■ नाशिक जिल्हा स्तर – सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख 7500 रुपये
■ इगतपुरी तालुका स्तर – सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक, रोख 5000 रुपये

Similar Posts

error: Content is protected !!