शेतीच्या बांधावर खतांची प्रतीक्षा ; शेतकरी मात्र ऑनलाईनवरच !

हरसुलला अडाणी शेतकऱ्यांचे हाल ; ऑनलाईन दिसतात खते आणि बांधावर मात्र खडखडाट

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

हरसुल परिसरात खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या असुन शेतकरी जोरदार पावसाबरोबरच खतांच्या प्रतीक्षेत आहेत. युरिया खताचा साठा ई –पॉस मशीनवर ऑनलाईन दिसत आहे. मात्र प्रत्यक्षात गोडावनमध्ये खडखडाट आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकृत खत विक्रेत्याकडे खते उपलब्ध होत नाहीत. युरिया बरोबरच सुफला १५/१५ , डी एपी या खतांचा देखील मोठा तुटवडा आहे.

हरसुल परिसरात मोठ्या प्रमाणावर भात लागवड करण्यात येते. येथील शेतकऱ्यांकडून युरिया व सुफला खतांची मोठी मागणी असते. लागवड तोंडावर असतांना शेतकऱ्यांना खते मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तर मिळेल ते वाहन घेऊन किंवा शेतकरी एकत्रितपणे गिरणारे, नाशिक व जिल्ह्यातील इतरत्र खाते विक्रेत्यांकडे खतांचा शोध घेऊन जास्त भावाने खते खरेदी करत आहेत. खतांच्या शोधात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार खतांची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत पडत आहे. ऑनलाइन खते उपलब्ध दिसत असली तरी प्रत्यक्ष दुकानदाराकडे उपलब्ध होत नाहीत. आणि खते उपलब्ध झालीच तर मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने खत लगेच संपून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांसाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत. कृषी विभागाने गावोगावी खते उपलब्ध करून द्यावी तसेच बांधावर खते उपलब्ध करून द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.
हरसुलला दरवर्षी खतांसाठी शेतकऱ्यांना इतरत्र भटकत फिरावे लागते. कधीही वेळेवर खतांचा पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतकरी मिळेल तिथून जास्तीच्या भावाने खते करून आपल्या शेतीची भूक पूर्ण करत असतात. खरीपाची लागवड सुरु झाली असुन कृषी विभागाकडून  शेतकऱ्यांना वेळेवर खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तात्काळ खते उपलब्ध करून देण्यात यावी व शेतकऱ्यांची खतांची मागणी पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
 

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!