देवळे येथील दोन्ही रस्त्यांमुळे २०० लोकांना मिळणार रोजगार : उद्योगधंदे आणि विकासामुळे उत्पन्नात होणार वाढ

देवळे येथील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी दिली माहिती

इगतपुरीनामा न्यूज, दि. २४

इगतपुरी तालुक्यातील देवळे येथील डोंगरी विकास निधीतील प्रत्येकी १५ लाखांचे झालेले दोन्ही रस्ते देवळे ग्रामस्थ आणि ह्या भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत. ह्या रस्त्याच्या बांधणीमुळे ह्या परिसरात शेतीपूरक उद्योग धंदे वाढण्याला चांगलाच हातभार लागणार असून गावातील किमान २०० लोकांना स्थानिक ठिकाणीच रोजगार मिळणार आहे. ह्या कामांमुळे गावचे उत्पन्न वाढण्याला चांगली मदत होणार आहे. लोकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ह्या कामांबाबत ग्रामस्थ समाधानी असून ह्यामध्ये कोणी खोडा घालू नये अशी अपेक्षा देवळे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना ग्रामस्थ म्हणाले की, विकास कामांची गावाला गरज असून ह्या कामांमुळे गाव आणि परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे. इगतपुरी हा संपूर्ण तालुका डोंगरी विभागात मोडत देवळे येथील कामेही या अंतर्गत होत असतात.

इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर यांच्या पाठपुराव्याने देवळे येथील १) इजिमा १७४ ते आनंद इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख, २) इजिमा १७४ ते मितेश ऍग्रो इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख अशी एकूण ३० लाख किमतीची २ कामे मंजूर करून घेण्यात आली. ह्या अनुषंगाने देवळे भागातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांची भूमिका मांडून ह्या कामांचे कौतुक केले. ह्या दोन्ही रस्त्यांमुळे ह्या परीसरात शेतीपूरक उत्पादनावर आधारित उद्योगधंदे सुरू होण्यासाठी नियोजन अंतिम टप्प्यात आहे. यामुळे ह्या भागातील लोकांना स्थानिक ठिकाणी चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे. किमान २०० लोकांना ह्यामुळे रोजगार मिळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. देवळे हे गाव घोटी शहराच्या अगदी जवळ आहे. ह्या शहरात जागेच्या अभावामुळे रहिवासी क्षेत्रात वाढ होऊ शकत नाही. मात्र देवळे गाव जवळ असल्याने ह्या परिसरात लवकरच रहिवासी क्षेत्र सुद्धा वाढणार आहे. यामुळे गावाच्या उत्पन्नात भरघोस वाढ सुद्धा होईल असेही ग्रामस्थ म्हणाले.

रस्ते झालेल्या परीसरात यापूर्वी रस्ते नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात पाठवण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने मोठी अडचण निर्माण झालेली होती. त्यामुळे समस्यांचा सामना करून शेतकरी फक्त पारंपरिक पिके घेत असत. आता रस्त्याचे काम चांगले झालेले असल्याने बागायती पिकांचे प्रमाण वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे. रस्ता होणे ही ह्या भागाला मिळालेली संजीवनी असून आमदार हिरामण खोसकर आणि संबंधित सर्वांची ग्रामस्थांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली.

ह्या सर्व कामांबाबत ग्रामस्थ आणि शेतकरी अतिशय समाधानी असून यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण करण्यात येऊ नये अशी अपेक्षा यावेळी शेतकरी आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली. ह्या कामांबाबत शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कोणीही काही निर्णय घेऊ नये असे आवाहन यावेळी करण्यात आले. यापूर्वी इगतपुरीनामामध्ये आणि काही ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या बातम्या चुकीच्या असून यामुळे विकासाला खीळ बसू शकते असेही यावेळी ग्रामस्थ व शेतकरी शेवटी म्हणाले