इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुक्यातील अनेक वाड्या पाड्यांना अनेक वर्षांपासून रस्त्यांची प्रतीक्षा आहे. गोरगरीब आदिवासी वस्त्यांना जोडणारे रस्ते व्हावेत यासाठी बरीच वर्षे सुरू असलेले प्रयत्न निष्फळ ठरलेले आहेत. यासह अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत केविलवाणी झालेली असूनही त्याकडे कोणी पाहायला तयार नाही. अशा स्थितीत इगतपुरी तालुक्यात आमदार महोदयांची दिशाभूल करून खासगी मालकीच्या जमिनींकडे जाणारे रस्ते करण्यात आले आहेत. डोंगरी भागाचा विकास होण्यासाठी असलेल्या निधीतुन ही कामे झाली असल्याने संबंधित योजनेच्या निकषांना डावलून ही कामे झाली आहेत. ज्या भागात कोणतीही लोकवस्ती नाही पण सामूहिक वापर होण्याची शक्यता सुद्धा दुर्मिळ आहे अशा ठिकाणी प्रत्येकी 15 लाख अशी 30 लाखांची 2 कामे कोणाच्या फायद्याची आहेत ? ह्याचा शोध लावणे आवश्यक आहे. ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील जागरूक नागरिक आक्रमक आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी ठेकेदार आणि अधिकारी यांनी आमदारांची दिशाभूल करून केलेल्या रस्त्याच्या कामांबाबत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर हे विविध विकास कामे करण्यात सक्रिय असतात. ह्याचा गैरफायदा ठेकेदार आणि अधिकारी घेतात. त्यानुसार २१ जानेवारी २०२१ ला देवळे ता. इगतपुरी येथे दोन रस्त्यांची कामे व्हावी म्हणून नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमदार खोसकर यांच्याकडील पत्र देण्यात आले. पत्रामध्ये नमूद केल्यानुसार १) इजिमा १७४ ते आनंद इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख, २) इजिमा १७४ ते मितेश ऍग्रो इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख अशी एकूण ३० लाख किमतीची २ कामे मंजूर करून घेण्यात आली. मंजूरी नंतर कामेही करण्यात आली.
तथापि ह्या दोन्ही कामांची सखोल माहिती घेतली असता डोंगरी निधीतून सर्व निकष आणि नियमांना तिलांजली दिली गेल्याचा अनेकांचा आरोप आहे. लोकवस्तीचा तपास नसूनही ही कामे मंजूर कशी होतात असा सर्वांना प्रश्न पडला आहे. ह्या भागात कोणाच्याही उपयोगी नसलेले ही ३० लाखांची २ कामे सर्रास खासगी हितासाठी झाली असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. ह्या भागातील बाहेरच्या व्यापारी वर्गासाठी प्राधान्याने ही कामे हाती घेऊन पूर्ण करण्याचा घाट घातलेला आहे. विशेष म्हणजे आमदार हिरामण खोसकर यांना चुकीची माहिती देऊन रस्ता मंजूर केला असल्याची ह्या भागात चांगलीच चर्चाही रंगली आहे.
डोंगरी भागातील ग्रामस्थांना दळणवळण करण्यासाठी सोयीस्कर व्हावे म्हणून डोंगरी विकास निधी अग्रक्रमाने वापरला जातो. यासाठी अनेक नियम आणि पूर्तता केली जाते. ह्या दोन्ही रस्त्यांसाठी सर्व नियम डावलून ठेकेदार आणि अधिकारी यांनी कोणत्या वर्गाचे हित जोपासले हे गावकऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हा प्रकार तालुक्यात सगळीकडे चर्चिला जात आहे. कोणाच्या वैयक्तिक हितासाठी निधीचा गैरवापर, आमदारांची केलेली दिशाभूल, नियम पायदळी तुडवले आदी मुद्यांवर तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. याप्रकरणी जागरूक नागरिकांकडून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येणार आहे.
Comments