वाल्मीक गवांदे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
इगतपुरी तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांवर युरिया खत उपलब्ध असूनही युरियासह अनावश्यक खते घेण्याची सक्ती होत आहे. कृषी सेवा केंद्राच्या मनमानीला चाप थांबवावे. यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब धुमाळ व तालुकाध्यक्ष किसन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवासी नायब तहसीलदार प्रवीण गोंडाळे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, कोविड 19 मुळे शेतकऱ्यांच्या मालाला आधीच भाव मिळत नाही. त्यामुळे शेतमाल फेकुन देण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. अशातच कृषी सेवा केंद्राचे मालक युरिया सोबत अनावश्यक खत घेण्याची जबरदस्ती करत आहेत. अनावश्यक खत न घेतल्यास युरिया खत देण्यास टाळाटाळ होत आहे. कृषी सेवा केंद्र चालक मनमानी करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
तालुक्यातील कोणत्याही कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्यांना युरिया खत न दिल्यास त्याचा परवाने रद्द करावा. कठोर कायदेशीर कारवाई करावी. युरिया खताबरोबर कुठलेही अनावश्यक खते खरेदीची सक्ती करू नये असे आदेश काढावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे. उत्तर महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब धुमाळ व तालुकाध्यक्ष किसन शिंदे, रामदास गायकर, सोपान टोचे, अरुण जुंद्रे, रामनाथ जाधव, बाळकृष्ण नाठे, काळु जाधव आदी उपस्थित होते.