इगतपुरीनामा विशेष : पर्यटकांसाठी खुशखबर ; काजवा महोत्सवासाठी भंडारदरा सज्ज

गौरव परदेशी, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने वन विभागाने पर्यटकांना भंडारदरा कळसूबाई अभयारण्यात कोरोना नियमांचे पालन करत पर्यटकांना मंगळवार पासून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत वन विभाग व परिसरातील ग्रामपंचायतींच्या सरपंचांची बैठकीतनिर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्यटकांना लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार शेवटच्या टप्प्यात का होईना पाहण्याची संधी मिळणार आहे. यामुळे पर्यटक, निसर्गप्रेमी, व्यावसायिक यांना उत्साह वाटत आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील भंडारदरा कळसूबाई या पर्यटनस्थळांवर दरवर्षी मे मध्ये काजवा महोत्सव रंगतो. मात्र ह्या महोत्सवाला यंदाही लॉकडाउनमुळे वनविभागाने प्रतिबंध केला होता. मात्र आता प्रवेश बंदी हटवल्याने पर्यटकांना प्रवेश सुरू करण्यात आला आहे. शनिवार रविवारी विकेंड असल्याने काजवा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांनी हजेरी लावली होती.

असा असतो काजव्यांचा निसर्गाविष्कार

ग्रीष्म ऋतू संपतो न संपतो, तोच वर्षाराणीच्या स्वागतासाठी निसर्ग देवताच जणू काजव्यांच्या रूपात धरतीवर अवतरलीय की काय असा विचार मनात चमकून जावा. गगनातील तारांगणच जणू भुईवर उतरलेय ! इथे रात्रच चांदण्याची झालीय, याचा प्रत्यय येथील महोत्सवाच्या निमित्ताने काजव्यांच्या दुनियेत येतो. मात्र, हा निसर्गाविष्कार पर्यटकांना, निसर्गप्रेमींना महोत्सवाच्या शेवटच्या टप्प्यात यंदा पाहता येणार आहे. दरवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांपर्यंत काजवा महोत्सव पाहण्यासाठी या परिसरात प्रचंड गर्दी होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित राहण्यासाठी वनविभागाने अभयारण्य परिसरात प्रवेश बंदी केली होती. मात्र आता प्रवेश बंदी उठवल्याने निसर्गप्रेमींना शेवटचे काही दिवस भंडारदरा कळसूबाई परिसरातील काजव्यांचे लुकलुकणे यंदा अनुभवता येत आहे.

काजव्यांची अनोखी दुनिया

भंडारदरा, घाटघर, कळसूबाई परिसरात पावसाळ्यातील जलोत्सव, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलोत्सव आणि मे अखेर आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यात हजारो झाडांवर काजव्यांची ही अनोखी दुनिया अवतरते. कळसूबाईच्या पायथ्याशी घाटघर, उडदावणे, पांजरे, मुरशेत, मुतखेल, कोलटेंभे, भंडारदरा, चिचोंडी, बारी या खेड्यांच्या शिवारात आणि रंधा धबधब्याजवळची झाडे लक्षावधी काजव्यांनी लगडतात. हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजव्यांचा हा काही दिवसांचा अदभुत खेळ चालतो.

पर्यटनबंदी उठविल्याने उत्साह
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महोत्सव पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता.याहीवर्षी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढत्या उपद्रवामुळे कोरोना आपल्या गावात येऊ नये यासाठी खबरदारीचा भाग म्हणून प्रशासनाने व वन्यजीव विभागाने मागील काही दिवसांपासून या परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घातली होती.त्यामुळे येथील जवळपास दीडशे ते दोनशे गाइड्सचा रोजगार बुडून हॉटेल व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत होता.मात्र आता पर्यटनबंदी उठविल्याने उत्साह निर्माण झाला आहे.

काजवा महोत्सवात दरवर्षी अशी होते आर्थिक उलाढाल

काजवा महोत्सवाच्या निमित्ताने त्या भागात दरवर्षी साधारण ५० ते ६० लाखांची उलाढाल होते. पर्यटकांकडून शुल्कापोटी सात लाख, दोनशे गाइडना साधारण चार ते पाच लाख, तर दहा ते पंधरा हॉटेलचा साधारण ४० लाखांच्या आसपासचा हॉटेल व्यवसाय होतो. यंदा महोत्सव होणार नसल्याने सगळ्यांचे मिळून ५० ते ६० लाखांच्या आसपास अर्थकारण बुडणार होते. मात्र आता महोत्सवासाठी पर्यटकांना प्रवेश दिल्याने या व्यावसायिकांचा थोड्या -फार प्रमाणात व्यवसाय होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.

थर्मल स्क्रिनिंग नंतरच अभयारण्यात प्रवेश

प्रत्येक पर्यटकाचे अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रिनिंग केले जाणार आहे. काजवे पाहण्यास आलेल्या पर्यटकांना लाईट व आवाज करण्यास मनाई राहणार आहे. एका स्पॉटवर २५ व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून, सर्वांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास पर्यटकांना प्रवेश बंदी केली जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
काजवा महोत्सव पाहण्यासाठी अभयारण्यात प्रवेश करण्यापूर्वीच प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत आहे. कोरोनाविषयी सर्व नियमांचे कडक पालन करण्यात येत असून आमच्या विभागाचे अधिकारी /कर्मचारी परिसरात कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. पुढील साधारण सात ते आठ दिवस काजव्यांची लूकलूक पर्यटकांना अनुभवता येईल. नंतर हळूहळू काजव्यांची संख्या कमी होत होईल.
- अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, भंडारदरा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!