भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
इगतपुरीनामा न्यूज, दि. १६
इगतपुरीनामा वेब पोर्टलने आपल्या वेगळ्या शैलीत इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसह जिल्हाभर भक्कम असं स्थान निर्माण केलं आहे. जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न शासनदरबारी पोहोचून लोकांना न्याय द्यावा अशीच इगतपुरीनामाची भूमिका आहे. त्यानुसार सोमवारी दि. १४ ला इगतपुरीनामा वेब पोर्टलवर “इगतपुरी तालुक्यात डोंगरी निधीचा गैरवापर ? ; २ रस्त्यांना ३० लाखांचा निधी जनतेसाठी की खासगी लॉबीसाठी ?” ह्या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. ह्या बातमीने इगतपुरीसह जिल्हाभर कहर केला. देवळे येथील खासगी जमिनी आणि खासगी लॉबीच्या हितासाठी ३० लाख किमतीचे २ रस्ते झाल्याचे वृत्त प्रकाशित केले. विशेष म्हणजे डोंगरी विकास निधीचे निकष, नियम डावलून एकच रस्ता दोन वेळा दाखवण्यात आला. याबाबत वृत्त प्रकाशित होताच सगळीकडे खळबळ माजली होती. हे वृत्त वाचल्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ह्याची तातडीने दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा परिषदेने चौकशी करून तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुढील आदेश होत नाही तोपर्यंत ह्या दोन्ही रस्त्यांना वितरित केलेला निधी खर्च करू नये असेही बजावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत काढलेल्या पत्रात “इगतपुरीनामा” वेब पोर्टलचा उल्लेख करून वेब लिंक सुद्धा दिलेली आहे. इगतपुरीनामाच्या दणक्याने डोंगरी निधीचा गैरवापर थांबणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. यासह दोन्ही तालुक्यातील विकासकामांची चौकशी सुद्धा होणार असल्याचे समजते.
इगतपुरी तालुक्यात डोंगरी विकास निधीतून १) इजिमा १७४ ते आनंद इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख, २) इजिमा १७४ ते मितेश ऍग्रो इंडस्ट्रीज देवळे रस्ता सुधारणा करणे ता. इगतपुरी रस्त्याची किंमत अंदाजे १५ लाख अशी एकूण ३० लाख किमतीची २ कामे मंजूर झाली होती. डोंगरी भागाचा विकास होण्यासाठी असलेल्या निधीतुन ही कामे झाली असल्याने संबंधित योजनेच्या निकषांना डावलले गेले होते. कोणतीही लोकवस्ती नसलेल्या निर्जन भागात सामूहिक वापर होण्याची शक्यता दुर्मिळ असतांनाही प्रत्येकी 15 लाख अशी 30 लाखांची 2 कामे खासगी लॉबीच्या हितासाठी करण्यात आली. विशेष म्हणजे रस्ता एकच पण त्याची दोन नावे ठेवून काम करण्यात आले. रस्त्याच्या नावाचा आणि ह्या भागाचा कोणताही संदर्भ सुद्धा जुळत नाही.
सोमवार दि. १४ ला प्रसिद्ध झालेली मूळ बातमी वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
https://igatpurinama.in/archives/2867
ह्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यासह जिल्हाभर लोकप्रिय झालेल्या “इगतपुरीनामा” ने ३० लाखांच्या रस्त्याची सत्यता जनतेसाठी आपल्या बातमीद्वारे उघडकीस आणली. बातमी प्रकाशित होताच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ह्या रस्त्याची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला. गटविकास अधिकारी, सभापती, पंचायत समिती सदस्य आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा भेट देऊन याबाबत माहिती घेतली.
सोमवारी दि. १४ ला “इगतपुरीनामा” पोर्टलवर प्रकाशित झालेली “इगतपुरी तालुक्यात डोंगरी निधीचा गैरवापर ?; २ रस्त्यांना ३० लाखांचा निधी जनतेसाठी की खासगी लॉबीसाठी ?” ह्या मथळ्याखालील बातमी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात वाचली गेली. ह्या बातमीची तातडीने नाशिकचे जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी यांनी दखल घेतली. श्री. जोशी यांनी नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या इ व द क्रमांक १ च्या कार्यकारी अभियंता यांना आज चौकशीबाबत आदेश निर्गमित केले. त्यामध्ये म्हटले आहे की देवळे येथील दोन्ही कामांबाबत सखोल चौकशी करावी. जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाच्या पुढील आदेशापर्यंत ह्या कामांवर वितरित केलेला निधी खर्च करू नये असेही आदेशात म्हटले आहे. निर्गमित केलेल्या पत्रात इगतपुरीनामा वेब पोर्टलवरील बातमीची लिंक आणि शीर्षक यांचा प्राधान्याने उल्लेख करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांकडून चौकशी कामकाज करण्यात येणार असून त्याकडे सामान्य नागरिकांचे सूक्ष्मपणे लक्ष लागले आहे. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं अशा अवस्थेत इगतपुरी तालुक्यातील तमाम जनतेला मूर्ख समजून कामे हाणून घेणाऱ्या खासगी लॉबीला नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने चांगलाच दणका मिळाला आहे. दोन्ही तालुक्यातील विकास कामांची सुद्धा यानिमित्ताने चौकश्या होण्याची शक्यता वाढली आहे.