किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १४
दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत समाजकल्याण मार्फत बौद्ध वस्तीत नियोजित आराखड्यानुसारच कामे व्हावीत. या व्यतिरिक्त एकही काम होता कामा नये. असे आढळल्यास आम्ही आत्मदहन करू असे निवेदन ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र दोंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे
शासनाच्या समाजकल्याण विभाग मार्फत दलित वस्ती सुधार योजनेतून बौद्ध वस्तीत विविध कामे केली जातात. त्यात तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ठराव मंजूर करण्यात येऊन कामांचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार विविध कामे केली जातात. परंतु विविध गावांतील काही राजकीय पुढारी आपला स्वार्थासाठी सरपंच व ग्रामसेवकांना हाताशी धरून नियम बाह्य आराखड्या बाहेरील कामे करून घेतली जातात असे निदर्शनास आहे असे ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष व सदस्य यांचे म्हणणे आहे
दरम्यान आता चालू वार्षिक योजनेंतर्गत नवबौद्ध घटकातील योजने अंतर्गत दलित वस्त्यांमध्ये विविध कामे मंजूर झाले असून ही कामे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु काही गावांमध्ये राजकीय वरदहस्त लाभलेल्या काही इसम हे सरपंच व ग्रामसेवक यांना हाताशी धरून दलित वस्ती साठी येणारे कामे दुसरीकडे वळवली जातात. तसेच जुनीच झालेली कामे नवीन दाखवून रक्कम हडप केली जाते. आता यापुढे असे होता कामा नये यासाठी ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटना इगतपुरी तालुका यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जर हा निधी दलित वस्ती सोडून इतरत्र कोठेही वळविला किंवा जुनेच कामे नवी दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर यास सरपंच व ग्रामसेवक यांनाच जबाबदार धरण्यात येईल. असे निदर्शनास आले तर आम्ही ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सामुहिक आत्मदहन करू असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य संघर्ष संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र दोंदे, उपाध्यक्ष अशोक मोरे, खजिनदार प्रशांत रुपवते, सचिव अशोक पगारे, सल्लागार बबलू उबाळे, संघटक रवी घाटेसाव, योगेश भरीत, विजय मोरे, अतिश पंडित, प्रकाश पंडित, संदिप भडांगे, प्रशांत रुपवते, कृष्णा सोनवणे, संदीप पवार, राहुल जगताप,अलका दोंदे आदींच्या सह्या आहेत.