सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. ३
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो परंतु हा सण केवळ रायगडावरच नाही तर संपूर्ण राज्यातील प्रत्येक सरकारी कार्यालयात साजरा व्हावा यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या कार्यालयात हा सोहळा साजरा होणार आहे. शिवप्रेमींनी शासनाचे आभार मानून निर्णयाचे स्वागत केले आहे.
६ जूनला साजरा होणाऱ्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सूचना
■ भगवा स्वराज्य ध्वज कसा असावा
ध्वज हा उच्च प्रतीचा सेंटिन असलेली भगवी पताका असावी. ध्वज तीन फूट रुंद आणि सहा फुट लांब, या प्रमाणात असावा. म्हणजेच लांबी रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंबा तलवार, शिवमुद्रा, वाघ नखे या शिवरायांचा पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा.
■ शिवशक राजदंड स्वराज्य गुढी अशी असावी
शिवशक राजदंडचे प्रतीक १५ फुटांचा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण लाल कपड्याची गुंडाळी असावी. राजदंड सरळ उभा करण्यासाठी त्याला किमान पाच ते सहा फुटांचा आधार असावा. सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षदा, हळद, कुंकू, ध्वनिक्षेपक असावे.
■ राज्यभिषेक असा करावा
शिवशक राजदंडावर स्वराज्य ध्वज बांधून घ्यावा. शिवरायांनी सर्व प्रस्थापित सत्ता पालथी करून स्वराज्याचा सर्व मंगल कलश रयतेच्या जोडीमध्ये रिता करून, जोडी सुख समृद्धी, समता, स्वातंत्र्याने भरली म्हणून शिवशक राजदंडाच्या वर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा सुवर्णकलश बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी अष्टगंध यांनी लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड, स्वराज्य गुढी सरळ उभी करावी. त्यानंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत म्हणून सांगता करावी.
बलाढ्य हिंदवी स्वराज्य, रयतेचे राज्य उभे केले, बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांचे स्वराज्य या मातीत उभे करून शिवरायांनी लोकशाही आणली। या मातीतील नव्या पिढीला हे सर्व कळावे त्यासाठी शिवराज्याभिषेक सोहळा हा प्रत्येक कार्यालयात करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे.
- निवृत्ती त्र्यंबक भगत, शिवव्याख्याते